प्रभादेवी, दादर रेल्वे स्थानक परिसरातील मीनाताई ठाकरे फुल मंडई परिसरामध्ये अनेक व्यापारी, व्यावसायिक रस्त्यावरच कचरा टाकतात, यास प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन खात्याने याठिकाणी कायमस्वरूपी एक कचरा संकलन व वाहतूक करणारे वाहन (कॉम्पॅक्टर) तैनात केले आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक गाळेधारकाला एक पेटी ठेऊन त्यातील कचरा महापालिकेच्या गाडीमध्ये जाऊन टाकणे बंधनकारक असेल. परंतु कचरा पेटी न ठेवता हा कचरा इतरत्र टाकल्यास त्या संबंधित गाळेधारकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. (BMC)
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध ठिकाणी कचरा वर्गीकरणाबाबत महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती केली जात आहे. परंतु, काही ठिकाणी रस्त्यावरच कचरा टाकत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यात मीनाताई ठाकरे फुल मंडईबाहेर दररोज फुलांचा ढीग टाकला जात असल्याच्या तक्रारीचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर जी-उत्तर विभागातील घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मीनाताई ठाकरे फुल मंडईतील व्यापारी, व्यावसायिक यांची बैठक घेतली. याची माहिती देताना उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव म्हणाल्या की, कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामी १ वाहन येथे सतत उभे असते. तरीही मंडईतील अनेक व्यावसायिक कचरा रस्त्यावर टाकतात. त्यामुळे विनाकारण महानगरपालिकेस नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. (BMC)
(हेही वाचा – ‘तू भी है राणा का वंशज, फेंक जहां तक भाला जाए’ Asian Games 2023 मध्येही नीरज चोप्राला सुवर्ण)
महानगरपालिकेने निवासी संकूल, घाऊक कचरा उत्पादक यांना स्वतःचा कचरा स्वतः विघटन करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्याच पद्धतीने फुल मंडईतील कचऱ्याचे जागीच विघटन करण्याबाबत सूचित केले आहे. प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या दुकानामध्ये १२० लीटर क्षमतेचे कचरा संकलन डबे (डस्ट बीन) ठेवणे तसेच महानगरपालिकेच्या वाहनामध्ये हा कचरा गोळा करणे बंधनकारक आहे. एवढेच नव्हे तर फुलांच्या कचऱ्यापासून अगरबत्ती बनविण्याचे कार्य करणाऱ्या संस्थेकडे हा कचरा दररोज देणे अभिप्रेत आहे. या बाबींचा गांभीर्याने विचार करता, जी उत्तर विभागाच्या बाजार निरिक्षक यांनी घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. कचरा अस्ताव्यस्तपणे न टाकता महानगरपालिकेच्या कॉम्पॅक्टरमध्येच टाकावा, असे आवाहन करण्यात आले. त्याचे उल्लंघन केल्यास यापुढील काळात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील उप आयुक्त चंदा जाधव यांनी यावेळी दिला. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community