सध्या पंजाबमध्ये खलिस्तान्यांनी देशविरोधी कारवायांना जोर दिला आहे, त्यामुळे त्यांचा म्होरक्या अमृतपाल सिंगविरोधात पोलीस आणि तपास यंत्रणा आक्रमक झाल्या आहेत. त्याला शोधण्यासाठी त्या जंग जंग पछाडत आहेत. त्या फरार अमृतपाल सिंगला लोकसभा खासदार आणि शिरोमणी अकाली दल (अमृतसर) चे प्रमुख सिमरनजीत सिंग मान यांनी देशद्रोही आवाहन दिले आहे.
पोलिसांसमोर शरण जाऊ नका, तर पाकिस्तानात पळून जा, असा सल्ला मान यांनी अमृतपाल सिंग याला दिला आहे. आम्हीही १९८४ मध्ये पाकिस्तानमध्ये गेलो होतो. अमृतपाल सिंगचे पाकिस्तानात पळून जाणे शिख इतिहासासाठी योग्य ठरेल. कारण त्याचे प्राण धोक्यात आहेत, तसेच सरकार आमच्यावर अत्याचार करत आहे, असा आरोपही मान यांनी केला आहे. दरम्यान, सिमरनजीत सिंग मान यांनी केलेली टिप्पणी ही १९८४ मधील त्या घटनांकडे इशारा करते ज्यांची परिणती अखेरीस शीखविरोधी दंगलीस कारणीभूत ठरल्या होत्या. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी जरनेल सिंग भिंडरावाले आणि इतर खलिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया मोडीत काढण्यासाठी ऑपरेशन ब्लूस्टारचे आदेश दिले होते. त्यानंतर काही महिन्यांतच इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती. त्यानंतर निर्माण झालेल्या संतापाच्या लाटेत १९८४ मध्ये दिल्ली आणि इतर अनेक शहरांमध्ये शीखविरोधी दंगली झाल्या होत्या. त्यात हजारो शीखांचा मृत्यू झाला होता.दरम्यान, गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अमृतपाल सिंग हा अमृतसरमधील स्वर्ण मंदिरातील अकाल तख्त, भटिंडा येथील तख्त दमदमा साहिब किंवा रूपनगरमधील आनंदपूर साहिब येथील तख्त श्री केशगड साहिब येथे बैसाखीच्या पूर्वसंध्येपूर्वी आत्मसमर्पण करू शकतो. अशावेळी सिमरनजीत सिंह मान यांचे वक्तव्य समोर आले आहे.
(हेही वाचा छत्रपती संभाजीनगर, मालवणीत दंगल…राज ठाकरेंनी आधीचे केलेले सावध; व्हिडिओ व्हायरल )
Join Our WhatsApp Community