BMC : मुंबईत ४० हजार नव्हे तर केवळ १,७१७ बेंचची खरेदी; ठाकरेंच्या ‘त्या’ आरोपांवरून चहल यांनी आणली खरी माहिती समोर

156

मुंबईमध्ये स्ट्रीट फर्निचरचा मोठा घोटाळा झाला असून याअंतर्गत ४० हजार बाकडे(बेंच) खरेदी असल्याचे सांगत शिवसेना उबाठा गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपाची हवाच महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी काढून टाकली आहे. मुंबईत ५० हजार बेंच नव्हे तर केवळ १७१७ बेंचेसची खरेदी केली जात असून प्रत्येक विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये सरासरी ३० ते ३५ बेंचे बसवले जाणार असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले.

महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हे स्पष्टीकरण दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू, अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर,सहआयुक्त सुनील धामणे, चंद्रशेखर चौरे आणि विजय बालमवार आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलतांना चहल यांनी, महानगरपालिकेच्या सर्व परिमंडळांतील विभागांमध्ये एकसूत्रीपणा असावा, विविध यंत्रणांमध्ये समन्वय रहावा तसेच एकाच पदपथावर तथा रस्त्यांवर एकाच ठेकेदारांमार्फत वेगवेगळे स्ट्रीट फर्निचर बाबींकरीता म्हणजेच खोदकाम, काँक्रिटीकरण, तांत्रिक  कामाचे पर्यवेक्षण हे सुलभ करण्याकरिता एकच ठेकेदाराची नेमणूक करण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा Sharad Pawar : पवारांना आठवले १९८० चे बंड; परदेश दौऱ्यावर असताना ५२ आमदारांनी सोडली होती साथ)

त्या अनुषंगाने एकूण १३ बाबींकरीता एकच ठेकेदार महानगरपालिकेच्या प्रचलित निविदा अटी व शर्तीनुसार स्ट्रीट फर्निचर निविदा प्रक्रिया ही ऑनलाईन ‘सॅप’ प्रणाली अंतर्गत राबविण्यात आली. तसेच ही निविदा मागविण्याकरिता सार्वजनिक वृत्तपत्रात व महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार रितसर निविदा प्रक्रियेने यशस्वी निविदाकारास कंत्राट देण्यात आले आहे. ही निविदा प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शकपणे राबविण्यात आली आहे. निविदामध्ये एकूण १३ बाबींपैकी ०४ बाबींचा समावेश महानगरपालिका ‘USOR’ नुसार  आहे. इतर ०९ बाबींबाबत रस्ते व वाहतूक विभागामार्फत  ‘Fair Item’ तयार करण्यात आला. त्यास प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली आहे. याअनुषंगाने १९ विभाग कार्यालयामार्फत मागविण्यात आलेल्या परिमानानुसार अंदाजपत्रक (BOQ) रुपये २२२ कोटी तयार करण्यात आले. पुढील ३ वर्षांत हा खर्च करावयाचा आहे. त्यापैकी केवळ २२ कोटी रुपये इतका खर्च झाला असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले.

या स्ट्रीट फर्निचर कंत्राटात ४० हजार बेंचची खरेदी केली जात असल्याचे सांगत हे कुठे बसवणार असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करत यात कशाप्रकारे चुकीची माहिती दिली हे सांगितले. परंतु या अंतर्गत ४० हजार  नव्हे तर १ हजार ७१७ बेंच बसवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्येक विभाग कार्यालयांमध्ये ३० ते ३५ बेंच बसवले जाणार आहेत.

तर दहा हजार ७०० कुंड्या बसवण्यात येणार असून प्रत्येक विभागातील उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या सुचनेनुसार त्यात झाडे लावून त्यासाठी कुंड्यांचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे या कुंड्यांमध्ये कंत्राटदारांमार्फत झाडे लावली जाणार असल्याचे त्यांनी चहल यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.