ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दल जनजागृती करावी तसेच नागरिकांना माहिती मिळावी यासाठी झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आला आहे. हा कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर नागरिकांना त्या झाडाबद्दलची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. (TMC)
”उद्यानांमधील नावीन्यपूर्ण संकल्पना” या उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या २१ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुमारे २००० झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, सूचना, अभिप्राय लक्षात घेवून महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशाप्रकारे क्यू आर कोड लावण्याचा मानस असल्याचे उपायुक्त यांनी सांगितले. आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, ”चला वाचूया” या मोहिमेत काही उद्यानात निसर्ग वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. त्यांना नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. त्याच मालिकेत आता हा क्यू आर कोड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी प्रत्येक झाडाची नोंद करून त्यानुसार हे क्यू आर कोड तयार करण्यात आले आहेत. अशाप्रकारे सुमारे २००० झाडांची माहिती संकलित केली गेली आहे. त्या २००० हून अधिक झाडांवर हे क्यू आर कोड लावताना ते नायलॉन दोरीच्या साहाय्याने बांधण्यात आले आहेत. झाडांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे. (TMC)
(हेही वाचा : Ram Temple Threat : बॉम्बस्फोट धमकी प्रकरणी एसटीएफकडून दोघांना अटक)
अशी मिळेल माहिती
• झाडावर लावण्यात आलेल्या क्यू आर कोड आपल्या स्मार्टफोन मध्ये स्कॅनरवर स्कॅन करायचा आहे.
• क्यू आर कोड स्कॅन केल्यावर विकिपीडिया या वेबसाईट वरील लिंक उघडेल. त्यावर क्लिक केल्यावर त्या झाडांची माहिती मिळेल.
• ही माहिती मराठी व इंग्रजीत मिळू शकणार आहे.
• माहितीमध्ये झाडाचे नाव, बॉटनिकल नाव, झाडांचे वैशिष्ट्य, उत्पत्तीस्थान आदींचा समावेश आहे.
कोणत्या उद्यानात क्यू आर कोड
माजिवडा – मानपाडा, ट्रॅफिक पार्क, कै. शांताराम विश्राम शिंदे जैवविविधता उद्यान, वर्तक नगर, कै. प्रमोद महाजन निसर्ग उद्यान, कै. वसंतराव डावखरे उद्यान, हँगिंग गार्डन, लोकमान्य नगर – सावरकर नगर, कै. धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यान, कचराळी तलाव उद्यान, ब्रम्हाळा तलाव उद्यान, वृंदावन सोसायटी उद्यान, लोकमान्य टिळक उद्यान, दत्ताजी साळवी निसर्ग शिक्षण केंद्र, श्री गणेश उद्यान, कै. नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, राम गणेश गडकरी रंगायतन उद्यान, दादोजी कोंडदेव क्रीडांगण उद्यान, नक्षत्र वन, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय उद्यान, कै. मुकुंद केणी क्रीडा संकुल, खारेगाव तलाव,खिडकाळी तलाव, राऊत उद्यान या उद्यानांचा समावेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community