मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या २७ शालेय साहित्यांच्या वाटपाला दरवर्षी होणारा विलंब आणि या वस्तूंचा दर्जा न तपासता त्या वस्तू अशाच द्याव्या लागत असल्याने पुढील शैक्षणिक वर्षांची निविदा या जुलै महिन्यापासून राबविण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मुलांना वाटप होणाऱ्या साहित्यांचा दर्जा तपासून खराब तथा निकृष्ट दर्जाचे साहित्य त्वरित संबंधित कंपनीकडून बदलून घेता येईल. शिवाय आता वितरक कंपन्या यांनाही हे वस्तू बनवण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.
मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यासाठी महापालिका शालेय विभागाच्या शिफारशीनुसार मध्यवर्ती खरेदी खात्याच्या माध्यमातून या साहित्यांच्या खरेदीसाठी निविदा मागवण्यात येते. पण मागील वर्षी शाळा सुरु झाल्यानंतरही साहित्यांच्या खरेदीची निविदा मंजूर करून कार्यादेश देण्यात आले नव्हते. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर काही महिन्यांनी शाळेतील मुलांना या साहित्यांचे वाटप झाले होते. मात्र, कंत्राटदारांकडून हे साहित्य विलंबाने होत असल्याने तत्कालिन सहआयुक्त अजित कुंभार यांनी सर्व कंत्राटदारांना दमात घेत मुलांना नियोजित वेळेत हे साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कंत्राटदारांना हे साहित्य तातडीने पुरवठा करावे लागले होते.
(हेही वाचा – नितीन देसाईंवर होते तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; एन. डी. स्टुडिओही होता जप्तीच्या वाटेवर)
परंतु मुलांना चांगल्या दर्जाचे साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी याच्या निविदा प्रक्रिया वेळेत होणे आवश्यक आहे. त्यामूळे अतिरीक्त आयुक्त आश्र्विनी भिडे आणि तत्कालिन सहआयुक्त अजित कुंभार यांनी महापालिका शिक्षणाधिाऱ्यांना निर्देश देत याबाबतची प्रक्रिया नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून राबवली जावी, असे कळवले. त्यानुसार महापालिका शिक्षण विभागाने याबाबत महापालिका मध्यवर्ती खरेदी खात्याला कळवले. शिक्षण विभागाच्या मागणीनुसार खरेदी खात्याने गणवेश, शुज अँड सँडल, कॅनवास बूट व मोजे, छत्री, रेनकोट आणि स्टेशनरी आदी २७ ते ३० साहित्याच्या खरेदीसाठी जुलै महिन्यापासूनच निविदा निमंत्रित केल्या आहेत. त्यामुळे निविदा मंजूर होऊन कार्यादेश दिल्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत हे सर्व महापालिका शाळांमध्ये उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शाळेत विद्यार्थी पटसंख्यानुसार साहित्य तपासून त्यांचे संच तयार करुन विद्यार्थ्याना वाटप केले जाईल असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community