महापालिकेत अभियंत्यांच्या बदल्यांचे रॅकेट! समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेत्याचा आरोप

मुंबई महापालिकेच्या सेवेत असलेले कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांच्या बदल्यांमध्ये मोठा गैरव्यवहार होत असून महापालिका अभियंत्यांच्या बदल्यांचे सर्व व्यवहार नगर अभियंता कार्यालयात होत असतात, असे आमदार रईस शेख म्हणाले.

पोलिस खात्यातील बदल्यांच्या रॅकेटची जोरदार चर्चा सुरु असतानाच मुंबई महापालिकेत सध्या बदल्यांचे एक मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा आरोप महापालिकेतील समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी केला आहे. महापालिकेच्या नगर अभियंता विभागाला लक्ष्य करत शेख यांनी अभियंत्यांच्या बदल्या या पैसे घेवून केल्या जात असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे पोलिस खात्यातील घोटाळा ज्याप्रमाणे बाहेर आला त्याप्रमाणे महापालिकेतील बदल्यांचा घोटाळाही बाहेर येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून याची चौकशी केली जावी आणि ठराविक कालावधीतच बदल्या व्हाव्यात यासाठी महापालिकेने ठोस धोरण ठरवावे, अशी मागणी शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे.

असे चालते रॅकेट!

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन देत त्यांनीही मागणी केली असून त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी यामध्ये अभियंत्यांच्या बदल्यांबाबत खूप मोठे रॅकेट नगर अभियंता विभागात चालत असल्याची बाब निदर्शनास आणून  दिली आहे. तीन वर्षे सेवा झाल्यावर परत त्याच जागेवर राहायचे असेल तर त्यासाठी अभियंत्यांकडून पैसे मागितले जात आहेत. पैसे नाही तर त्यांची बदली केली जात आहे. तसेच काही वेळेला विशेष बाब दाखवून एखाद्या अभियंत्यांची कालावधी संपण्यापूर्वीच बदली केली जाते. या बदलीसाठी लिपिकही अभियंत्यांकडून पैसे मागतात, अशा आपल्याकडे तक्रार आल्याचे शेख यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले.

(हेही वाचा : आता रुग्णालयातून थेट हॉटेलमध्ये व्हावे लागणार दाखल! मुंबई महापालिकेचा निर्णय)

…तर महापालिकेची बदनामी होईल!

मुंबई महापालिकेच्या सेवेत असलेले कर्मचारी, अधिकारी व अभियंते यंच्या बदल्यांमध्ये मोठा गैरव्यवहार होत असून महापालिका अभियंत्यांच्या बदल्यांचे सर्व व्यवहार नगर अभियंता कार्यालयात होत असतात. अशाप्रकारे पैसे देवून बदली केलेले अथवा बदली करून घेतलेले कर्मचारी, अधिकारी व अभियंते हे आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्यातूनच मुंबईत अनेक दुघर्टना घडत असतात. त्याचे दुष्परिणाम मुंबईकरांना भोगावे लागतात. यातून भांडुपच्या ड्रीम मॉलच्या आगीची घटना असो वा काही वर्षांपूर्वी कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीची दुघर्टना असो, असे प्रकार घडत असतात. सेवेतील कर्मचाऱ्यांची बदली होण्याबाबत महापालिकेचे काहीही धोरण नाही. त्यामुळे असाच प्रकार सुरु राहिल्यास पोलिस खात्यातील घोटाळा ज्याप्रमाणे सर्वांसमोर आला आहे, त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेतील बदल्यांच्या घोटाळा बाहेर येवून महापालिकेची बदनामी होईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here