आदिवासी पाड्यात ‘असा’ रोखण्यात आला बालविवाह!

114

जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या तातडीच्या निर्णयामुळे मुरुड तालुक्यातील मौजे भोईघर येथील टेंभोंडे आदिवासी वाडी येथे होणारा बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळालं. या घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर कल्याणकर यांनी जनतेला आवाहन केले आहे की, बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना बळी पडू नका.

जिल्ह्यातील कातकरी आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना सर्व प्रकारचे शासकीय लाभ, दाखले मिळवून देण्यासाठी, आरोग्य सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी, त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी, त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून कातकरी उत्थान अभियान व सप्तसूत्री कार्यक्रम सर्व स्तरांवरून राबवण्यात येत आहे.

बालविवाह रोखण्याचे निर्देश

डॉक्टर कल्याणकर यांना 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजताच मौजे भोईघर येथील टेंभोंडे आदिवासीवाडी येथे बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर कल्याणकर यांनी तातडीने मौजे भोईघर येथील टेंभोंडे आदिवासीवाडी येथे जाण्याबाबत व संबंधितांचे प्रबोधन करून हा बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले.

प्रबोधन आणि मार्गदर्शन केले

त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी अलिबाग प्रशांत ढगे व मुरुड तहसिलदार रोहन शिंदे यांनी तत्काळ मुरुड तालुक्यातील निवासी नायब तहसिलदार रविंद्र सानप, भोईघर तलाठी अमृत चोगले यांना घटनास्थळी पाठवले. भोईघर गावचे सरपंच काशिनाथ वाघमारे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी चौकशी केली असता, टेंभोंडे आदिवासीवाडी येथे दुपारी 2 च्या सुमारास राणी वाघमारे, वय 15 शांताराम लक्ष्मण जाधव, वय 17 राहणार साळाव आदिवासीवाडी संजयनगर यांचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर स्थानिक प्रशासनातील निवासी नायब तहसिलदार रविंद्र सानप, भोईघर तलाठी अमृत चोगले, भोईघर गावचे सरपंच काशिनाथ वाघमारे या सर्वांनी मुलीची आई यमुना लक्ष्मण वाघमारे व त्यांच्या कुटुंबियांचे हा बालविवाह न करण्याबाबत योग्य प्रबोधन व मार्गदर्शन केले.

( हेही वाचा: मलिकांचा हात वेश्या व्यवसायातही! भाजपचा सनसनाटी आरोप )

असा रोखण्यात आला बालविवाह

त्याचप्रमाणे वर मुलगा मौजे साळाव येथील असल्याने रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात, मंडळ अधिकारी लक्ष्मण शेळके, साळाव तलाठी भावना धोदडे, निडी पोलीस पाटील नितेश पाटील, साळाव पोलीस पाटील मेहबूब हुसैन गोरमे व साळाव ग्रामपंचायत सदस्य राजू वाघमारे, साळाव सरपंच निलम पाटील, ग्रामस्थ नरेश वाघमारे या सर्वांनी मौजे साळाव येथेच मुलाचे वडील लक्ष्मण जाधव व त्यांच्या कुटुंबियांचे प्रबोधन व मार्गदर्शन करुन बालविवाह रोखला. यावेळी या दोन्ही कुटुंबांकडून हा बालविवाह करणार नसल्याची लेखी हमीही घेण्यात आली. अशा प्रकारे डॉक्टर कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने केलेल्या तत्काळ कार्यवाहीने हा बालविवाह यशस्वीपणे रोखण्यात आला. तसेच संबंधित दोन्ही कुटुंबांचे प्रबोधन करून बालविवाहसारख्या अनिष्ट प्रथेबद्दल जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी पाऊल उचलले गेले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.