केंद्रीय लोकसेवा आयोगाला रेल्वे मंत्रालयाने मोठी जबाबदारी दिली आहे. याअंतर्गत आता रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, इंडियन रेल्वे मॅनेटमेंट सर्व्हिसची भरती खास तयार केलेल्या परीक्षेद्वारे केली जाईल. युनियन लोकसेवा आयोग (UPSC) २०२३ पासून रेल्वे भरती परीक्षा आयोजित करणार आहे.
( हेही वाचा : मोदी सरकार तरुणांना देणार ३४०० रुपये? वाचा व्हायरल मेसेज मागचे सत्य… )
आयआरएमएसई ही दोन टप्प्यामधील परीक्षा असेल. त्यामध्ये प्राथमिक चाळणी परीक्षा, त्यानंतर मुख्य लेखी परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असेल. परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच आयआरएमएस(मुख्य) लेखी परीक्षेसाठी योग्य प्रमाणात उमेदवार निवडण्यासाठी, सर्व पात्र उमेदवारांना नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा द्यावी लागेल आणि त्यामधून योग्य संख्येमध्ये आयआरएमएस(मुख्य) परीक्षेसाठी उमेदवारांची निवड होईल.
आयआरएमएस( मुख्य) परीक्षेमध्ये खालील विषयातील चार पेपर्सचा समावेश असेल.
i.पात्रता परीक्षेचे पेपर
- पेपर ए- राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या भारतीय भाषांपैकी एका भाषेची निवड उमेदवाराला करावी लागेल – 300 गुण
- पेपर बी- इंग्रजी 300 गुण
ii.गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणारे पेपर
- पर्यायी विषय पेपर 1 –250 गुण
- पर्यायी विषय पेपर 2 –250 गुण
iii.व्यक्तिमत्व चाचणी – 100 गुण
पर्यायी विषयांची यादी ज्यामधून उमेदवाराला केवळ एका विषयाची निवड करता येईल.
- i.सिव्हिल इंजिनिअरिंग
- ii.मेकॅनिकल इंजिनिअरिंग
- iii.इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
- iv.कॉमर्स अँड अकाउंटन्सी
पात्रता परीक्षेसाठी वर उल्लेख केलेल्या पेपर्ससाठी आणि पर्यायी विषयांसाठीचा अभ्यासक्रम नागरी सेवा परीक्षेसारखाच(सीएसई) असेल. नागरी सेवा(मुख्य) परीक्षा आणि आयआरएमएस(मुख्य) परीक्षांचे सामाईक उमेदवार वर उल्लेख केलेल्या पर्यायी विषयांपैकी कोणत्याही विषयाची निवड या दोन्ही परीक्षांसाठी करू शकतात किंवा प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळे विषय (सीएसई(मुख्य) परीक्षेसाठी एक आणि आयआरएमएसई(मुख्य) परीक्षेसाठी एक) या परीक्षांच्या योजनांनुरुप निवडू शकतात. पात्रता परीक्षेचे पेपर आणि पर्यायी विषयांच्या( प्रश्नपत्रिका आणि उत्तरे लिहिण्यासाठी) भाषेचे माध्यम आणि स्क्रिप्ट सीएसई(मुख्य) परीक्षेप्रमाणेच असेल.
Join Our WhatsApp Community