पॅसेंजर गाड्यांचे एक्स्प्रेसमध्ये रुपांतर झाल्याने प्रवाशांची गैरसोय

99

कोरोना काळात बंद केलेल्या पॅसेंजर गाड्यांचे रुपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना तिकीट दर जास्त मोजावा लागत असून, रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. पॅसेंजर गाड्या तात्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

( हेही वाचा : नवरात्रीसाठी मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! BKC ते ठाणे सुरू होणार प्रिमियम बससेवा)

प्रवाशांची गैरसोय 

कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे वाहतूक बंद केली होती. विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताच रेल्वे प्रशासनाकडून सेवा पूर्ववत करण्यात आली. पण अजूनही सर्वसामान्यांना परवडणारी पॅसेंजर सेवा सुरू करण्यात आली नसल्यामुळे ग्रामीण भागांतून येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुणे शहरात सर्व शासकीय मुख्यालये असल्यामुळे उपनगर आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. तसेच ग्रामीण भागातील बरेच शेतकरी मार्केट यार्डात शेतमाल विक्रीसाठी, थकलेली बिले घेण्यासाठी, खासगी कंपन्यामध्ये कामाला आणि इतर कामानिमित्त येत असतात. ग्रामीण भागातील सर्वच स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत.

रेल्वे प्रशासनाने काही मार्गावरीस पॅसेंजर बंद करून या मार्गावर डेमू सेवा सुरू केली तर काही मार्गावरील गाड्यांना एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. या गाड्यांच्या तिकीट दरात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पुणे- दौंड आणि पुणे- बारामती मार्गावर पूर्वी पॅसेंजर गाड्या सुरू होत्या यात बदल करून आता डेमू रेल्वे चालवल्या जात आहेत. तर पुणे-सोलापूर पॅसेंजर गाडीला एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. या दोन्ही मार्गावरील गाडीच्या दर्जात बदल केला असल्यामुळे तिकीट दरात वाढ झाली आहे. पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसचा दर्जा देऊन प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी मंचाने केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.