पश्चिम रेल्वे मार्गावर स्वस्तात शुद्ध पाणी उपलब्ध करून देणारी वॉटर वेंडिंग यंत्र सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात लवकरच ९७ वॉटर वेंडिंग यंत्रे बसवण्यात येणार आहेत अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. ९७ पैकी ६७ वॉटर वेंडिंग यंत्रे ही मुंबई उपनगरिय स्थानकांमध्ये बसवण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : ‘अमृत भारत स्थानक’ योजना; मध्य रेल्वेच्या या १५ स्टेशनचे रुप बदलणार)
प्रवाशांना प्रवासादरम्यान शुद्ध, थंड पाणी मिळावे यासाठी आयआरसीटीने मध्य व पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांमध्ये वॉटर वेंडिंग यंत्रे बसवली होती. चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंतच्या एकूण ३७ स्थानकांमध्ये ६७ यंत्रे बसवण्यात येणार आहेत. तर पालघर, उदवडा, उधना, सुरत, नंदुरबार या स्थानकांतही ही यंत्रे उपलब्ध करण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात येणार आहे.
वॉटर वेंडिंग यंत्रणेद्वारे स्वस्तात पाणी
- प्रवाशांना बाटलीमध्ये पाणी हवे असल्यास ३०० मि.ली. पाण्यासासाठी १ रुपया आकारण्यात येईल.
- रेल्वेकडील बाटली किंवा ग्लासमध्ये ३०० मि.ली. पाणी हवे असल्यास २ रुपये आकारले जातील.
- ५०० मि.ली. पाण्यासाठी अनुक्रमे ३ रुपये आणि ५ रुपये, एक लिटर पाण्यासाठी अनुक्रमे ५ रुपये व ८ रुपये, दोन लिटर पाण्यासाठी ८ रुपये आणि १२ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
- या सुविधेला प्रवाशांकडूनही पसंती मिळाली आहे. मात्र कोरोनाकाळात ही सेवा बंद करण्यात आली होती. आता रेल्वेने पुन्हा एकदा ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.