मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाच्या सर्व प्रयत्नांनंतरही मुंबईतील गाड्यांमधील तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना आढळून येत नाही. मध्य रेल्वेने एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत विना तिकीट प्रवास करताना पकडलेल्या लोकांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार या प्रवाशांकडून रेल्वेने मुंबई विभागात १०० कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले असून, रेल्वे मंत्रालयाच्या कोणत्याही विभागासाठी हा विक्रम आहे.
१२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली
मध्य रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान, एकूण १८.०८ लाख प्रवासी लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये तिकिटांशिवाय प्रवास करताना पकडले गेले. मध्य रेल्वेने या प्रवाशांकडून १००.३१ कोटी रुपये दंड वसूल केला. रेल्वेच्या आकडेवारीनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये मध्य रेल्वेने १२.०३ लाख प्रवाशांकडून सुमारे ६१.६२ कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता, म्हणजेच या वर्षी रेल्वेने ३९ कोटी रुपयांचा अतिरिक्त दंड वसूल केला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात तिकीट नसलेल्या प्रवाशांची संख्या सुमारे ६ लाख अधिक आहे, यावरून असे दिसून येते की, रेल्वेच्या सर्व आवाहनांचा आणि सखोल तपासणी मोहिमेचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. आकडेवारीनुसार, एसी लोकल ट्रेनमध्ये २५,००० प्रवासी विना तिकीट प्रवास करताना पकडले गेले आहेत, ज्यांच्याकडून रेल्वेने ५.०५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापूर्वी, मध्य रेल्वेने २०१९-२० या आर्थिक वर्षात विना तिकीट प्रवाशांकडून दंड वसूल करण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर मध्य रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या १५.७३ लाख लोकांकडून ७६.८२ कोटी दंड वसूल केला होता, जो या आर्थिक वर्षात मोडला गेला.
(हेही वाचा आसाममध्ये हिंदूंच्या घरवापसीला वेग; ११ कुटुंबातील ४३ जणांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश)
Join Our WhatsApp Community