मंगळवारची सकाळ मुंबईकरांना पुन्हा पावसाचा सरप्राईज देणारी ठरली. भायखळा, लालबाग, कुलाबा यांसह नवी मुंबईतील बहुतांश भागांत सकाळीच पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या दोन दिवसांपासून वेधशाळा दुपारच्या प्रहरात पावसाच्या प्रतीक्षेत होती. मात्र वरुणराजाने मंगळवारचे मुंबईकरांचे गुडमॉर्निंग पावसाच्या सरींनी केले.
पश्चिम उपनगरांत पावसाच्या सरी
दक्षिण मुंबईच्या तुलनेत माटुंगा, कुर्ला या परिसरांत काही मिनिटांसाठी हलका पाऊस झाला तर पश्चिम उपनगरांत अंधेरी परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. मात्र सकाळी दहाअगोदरच वातावरण पूर्ववत झाले. चाकरमान्यांच्या कार्यालयीन वेळा गाठण्याच्या प्रवासात वरुणराजाने त्रास दिला नाही. दहानंतर बहुतांश भागांत सूर्यदेवाचे प्रखर दर्शनही झाले.
( हेही वाचा नवाबचे दाऊदशी, तर उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप )
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला अंदाज
मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु असताना, दक्षिण कोकणात काल मॉन्सूनपूर्व सरींचे आगमन झाले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वा-यांचा वेगही वाढल्याचा अनुभव येत होता. अशातच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात मॉन्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत होता. विदर्भातही अधूनमधून मॉन्सूनपूर्व पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र शनिवारी रात्रीपासून मुंबईत पावसाच्या सरी कोसळू लागल्या, त्यानंतर मुंबई महानगर परिसरातही पावसाची रिपरिप सुरुच होती. मंगळवारी सकाळी मात्र पावसाने जोमानेच मुंबई व महानगर परिसरात हजेरी लावली. मंगळवारी सायंकाळी किंवा रात्री हलका पाऊस राहील, दिवसभर आकाश ढगाळ राहील, असा अंदाज सकाळीच मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
Join Our WhatsApp Community