राज्यात मागील एक महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने दीर्घकाळाने कम बॅक केले आहे. राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली आहे. किनारपट्टीच्या भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत असून मंगळवारी चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून रेड अलर्ट दिला आहे.
Severe weather warnings over the region during next 5 days. Kindly visit https://t.co/89p4H3QwEY… for detailed district wise forecast and warnings. pic.twitter.com/xqnowferjC
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 12, 2021
राज्यातील पावसाचा अंदाज
चार जिल्ह्यांतील डोंगराळ परिसरात अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे. तर पुणे, औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल, असे हवामान विभागाने म्हटलं आहे. तर नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ
रायगड जिल्ह्यात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा बसला असून, सरासरी ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुरुड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, तालुक्यात २४ तासांत तब्बल ३४८ मिलीमीटर पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे काशिद येथे पूल वाहून गेला असून, या दुर्घटनेत एक वाहन चालक वाहून गेला आहे. राजपूरी आणि कळवटे येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तर उसरोली नदीलाही पूर आल्याने सुपेगाव मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात रविवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. किनारपट्टीवरील भागात पावसाचा जोर दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community