महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा रविवारी इंद्रधनुष्य २०२३: सादर करणार कला आणि क्रीडा प्रकार

133

महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे ‘इंद्रधनुष्य २०२३’ हा कला आणि क्रीडा सादरीकरणांचा सांस्कृतिक सोहळा रविवार, ५ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता वरळी येथील सरदार वल्लभाई पटेल इनडोअर स्टेडियम (NSCI) येथे आयोजित करण्यात येत आहे.  या कार्यक्रमात संचलन, मानवंदना, तालबद्ध योगासने, लोकनृत्य, मानवी मनोरे अशा विविध १५ प्रकारातील कार्यक्रमांचे सादरीकरण सुमारे २ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांमार्फत केले जाणार आहे.

या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल हे सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

(हेही वाचा संदीप देशपांडेंवरील हल्ल्यावरून मनसे-राष्ट्रवादीत ट्विटर वॉर)

महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, सहआयुक्त (शिक्षण) (अतिरिक्त कार्यभार) अजित कुंभार यांच्यासह महानगरपालिकेचे विविध अधिकारी देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेऊन ज्यांनी यशाचे उच्च शिखर गाठून समाजामध्ये मानाचे स्थान मिळविले आहे, असे महानगरपालिका शाळेतील १०० माजी विद्यार्थी, मागील तीन वर्षात महानगरपालिका शाळांमध्ये माध्यमिक शालांत (१० वी) परीक्षेमध्ये सर्वाधिक गुणसंपादन केलेले ७५ विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,  पालक त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्राशी संबंधित बिगर शासकीय संस्थांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.