शुक्रवारी अचनाक मनसोक्त कोसळलेल्या पावसाने दोन दिवस चांगलेच थैमान घातले. रविवारपासून मुंबईत केवळ हलक्या पावसाच्या सरी अधूनमधून सुरु आहेत. तीस अंशापर्यंत खाली सरकलेले कमाल तापमान आता सोमवारी ३३ अंश सेल्सिअसपर्यंत येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला.
रविवारी मुंबईचे कमाल तापमान एका अंशाने वाढल्याचे दिसून आले. कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. तापमान आता पू्र्ववत होत असल्याने ऑक्टोबर महिन्यात तीस अंशापुढे सरकणारे कमाल तापमान आता येत्या दिवसांत ३१ अंशाच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. सोमवारी कमाल तापमान ३३ तर मंगळवारी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदवले जाईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. किमान तापमानही आता हळूहळू वाढ होणार आहे. येत्या दिवसांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअसवर नोंदवले जाईल. ढगाळ वातावरणामुळे आता आर्द्रताही वाढू लागली आहे. रविवारी सांताक्रूझ येथे ८३ टक्के आणि कुलाबा येथे ९२ टक्के आर्द्रता वाढली आहे. येत्या दिवसांत आकाश अंशतः ढगाळ राहील, तर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community