देशात उत्तरेकडील राज्यात पावसाने पुन्हा कहर केलेला असताना राज्यात अद्यापही मुसळधार पावसाला मुहूर्त लागलेला नाही. अजून पाच दिवस मुसळधार पावसाची सूतराम शक्यता नाही. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पाऊस 20 ऑगस्टनंतर जोमाने बरसेल.
देशात जून महिन्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशात जास्त पाऊस होतो. मात्र मुंबईत यंदा जुलै महिन्यात विक्रमी पाऊस झाला. मुंबईत दोन हजार मिमीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. तर उत्तरेकडील राज्यात पूर आला. सध्या हिमाचल प्रदेशातील बराच भाग पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. हिमाचल प्रदेशात सलग दुसऱ्या महिन्यात पूर आल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सध्या मुंबईत दिवसा ढगाळ वातावरण आहे. मुंबईत रात्री एखाद दुसरी मोठी सर येते. दुपारच्या सत्रात ढगाळ आणि उन्हाचा अनुभव येऊ लागला आहे. संध्याकाळी क्वचित प्रसंगी हलकी सर मुंबईकरांना अनुभवायला मिळत आहे. मुंबईसह राज्यात 18 तारखेपासून पावसाला पोषक वातावरण दिसून येईल. त्यानंतर महिन्याच्या शेवटापर्यंत पाऊस सक्रिय राहील. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यातील सरासरी पावसाची शक्यता वेधशाळा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या दिवसांत विदर्भात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे चांगल्या पावसाची शक्यता आहे. कोकणात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस होईल.
Join Our WhatsApp Community