Raj Thackeray : राज ठाकरे यांनी कोणाला व का सुनावले?

103

मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत आणि इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दुकानांवरील मराठी पाट्याना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना सुनावले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील दुकाने, आस्थापना यावर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत, असा निकाल दिला आहे. राज ठाकरे यांनी यासंदर्भात मंगळवारी एक्सवरून न्यायालयाच्या  निर्णयाचे स्वागत करत व्यापाऱ्यांना आपल्या शैलीत सुनावले आहे.  दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बजावले आहे. ‘मराठी पाट्या’ ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली. त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे.

(हेही वाचा Gurpatwant Singh Pannu : आता समोर आले खलिस्तानी दहशतवादी पन्नूचे भारत तोडण्याचे मनसुबे; दिली गंभीर धमकी)

‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला.  आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे, असेही राज ठकरे यांनी एक्समध्ये नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.