Rajawadi Hospital : कचराकुंडीत आढळलेल्या अर्भकाला राजावाडी रुग्णालयाने दिले जीवदान

डॉक्टरांसह नर्स आणि महिला पोलिसही घेतात बाळाची काळजी

243
Rajawadi Hospital : कचराकुंडीत आढळलेल्या अर्भकाला राजावाडी रुग्णालयाने दिले जीवदान
Rajawadi Hospital : कचराकुंडीत आढळलेल्या अर्भकाला राजावाडी रुग्णालयाने दिले जीवदान

‘देव तारी त्यास कोणी मारी’ असं आपण नेहमी म्हणतो. सुमारे महिनाभर पूर्वी म्हणजे सोमवार १२ जून २०२३ रोजी पवई परिसरात कचराकुंडीत टाकून दिलेल्या एका अर्भकास जीवदान मिळाले आणि ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयाने वेळीच उपचार करून या अर्भकास जीवदान तर दिलेच, त्यासोबतच मायेची उब देऊन त्याचा सांभाळही केला जात आहे.

साधारण १.४ किलो वजन असलेले नवजात अर्भक पवई परिसरातील एका कचराकुंडीत अज्ञाताने टाकून दिल्याचे आढळून आले. या कचराकुंडी जवळून जात असलेल्या एका सुजाण नागरिकाने या बाळाचा आवाज ऐकताच तत्परतेने पवई पोलिसांना कळवले. त्यानंतर पवई पोलिसांच्या निर्भया पथकाने त्यास घाटकोपर स्थित महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात या अर्भकास दाखल करुन त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. पोलिसांनी हे अर्भक रुग्णालयात आणले तेव्हा ते थंडीने अक्षरश: कुडकुडत होते. थंडीमुळे त्याच्या शरीराचे तापमानही कमी झाले होते. मात्र रुग्णालयातील बालरोग आणि नवजात शिशू अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या अर्भकाला वेळीच आणि योग्य उपचार देण्यात आले. तसेच या अर्भकाला कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून पुरेशी काळजीही घेण्यात आली.

आता या बाळाचे वजन चांगल्यारितीने वाढले असून, त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. सध्या या बाळाचे वजन २.२ किलोग्रॅम एवढे आहे. नवजात अर्भक असल्याने स्वाभाविकच त्याला आईचे दूध देणे खूप गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेता सध्या त्याला Simyl MCT आणि राजावाडी रुग्णालयातील ह्युमन मिल्क बँकेमार्फत दूध पुरविले जात आहे. याव्यतिरिक्त या अर्भकास बीसीजी, ओपीव्ही आणि हिपॅटायटीस बी यांसारखे महत्त्वाचे लसीकरणही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राजावाडी रुग्णालयात असलेली ह्युमन मिल्क बँक ही महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील पहिलीच मानवी दुग्ध पेढी आहे. याप्रसंगत, आई नसलेल्या बाळासाठी खऱ्या अर्थाने ती अमृतदायी ठरली आहे.

(हेही वाचा – महापालिका प्रशासनालाच नाही अतिक्रमणांवर कारवाई करण्याची इच्छा!)

सुरुवातीला राजावाडी रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात व त्यानंतर प्रसूति पश्चात उपचार विभागात डॉ. अमीत व्हटकर, डॉ. राधा बालाजी, परिसेविका सुरेखा महाकाळ, पूजा नवलकर, अमीता खंडागळे व इतर कर्मचाऱ्यांकडून या अर्भकाची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. एवढेच नव्हे तर, पवई पोलीस निर्भया पथकातील महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना पवार या सातत्याने रुग्णालयात तैनात राहून या बाळाची काळजी घेत आहेत. राजावाडी रुग्णालय प्रशासनाने संबंधित पोलिस स्थानकास सदर बाळ सापडल्याच्या घटनेबाबत माहिती पुरविली असून त्याआधारे पोलिस प्रशासन पुढील तपास करीत आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक (प्रभारी) डॉ. भारती हेमंत राजूलवाला यांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.