राकेश टिकैतांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर कोरोनाचा ‘हल्लाबोल’

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा यवतमाळ दौरा आणि विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांची कोल्हापुरातील सभा रद्द झाली. 

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चातर्फे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत विविध राज्यात महापंचायतींचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, आता विविध राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने त्यांचे दौरे रद्द होत आहेत.

मुहुर्तालाच खोडा!

मागील अडीच महिन्यांहून अधिक काळ केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर धुडगूस घालत केंद्र शासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांना हरियाणा, पंजाब व्यतिरिक्त अन्य राज्यांतील शेतकरी पाठिंबा देत नाहीत, त्यातच आहेत त्या शेतकरी संघटनांमध्येही फूट पडल्याने टिकैत यांचे आंदोलन आता फार काळ टिकत नाही, अशी चिन्हे दिसताच त्यांनी देशभर दौरा करण्याचा निर्णय घेतला. त्याचा पहिला टप्पा महाराष्ट्रातून सुरू होणार होता. कारण एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या जास्त आहेत, त्याने शेतकरी दुःखी कष्टी आहेत, तसेच दुसरीकडे राज्यात ज्यांचे सरकार आहे, ते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचा भाजपाला पर्यायाने केंद्र सरकारला आणि त्यांच्या कृषी कायद्यांना विरोध आहे. त्यामुळे जमीन भुसभुशीत आहे म्हणून टिकैत यांनी महाराष्ट्राची निवड केली होती, परंतु अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने टिकैत यांना नाईलाजास्तव त्यांचा हा दौरा रद्द करावा लागला. तशी माहिती त्यांनी स्वत: फेसबुक लाईव्हद्वारे दिली. अशा रीतीने शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेते होण्याच्या टिकैत यांच्या प्रयत्नांच्या मुहुर्तालाच खोडा बसला आहे.

(हेही वाचा : राज्यात मिनी लॉकडाऊन? जिल्हा, तालुका पातळीवर निर्बंध वाढवले!)

असा होता टिकैत यांचा दौरा!

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात संयुक्त किसान मोर्चातर्फे दिल्लीच्या सीमांवर जे आंदोलन सुरू आहे, त्याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळावा या उद्देशाने यवतमाळमधील आझाद मैदानावर टिकैत यांची सभा नियोजित होती. त्यासाठीची सर्व तयारीही करण्यात आली होती. सभा कोणत्याही परिस्थितीत होईल, असे सभेच्या आयोजकांनी सांगतिले होते. दरम्यान, शुक्रवारी माध्यमांशी बोलताना टिकैत यांनी आपण शनिवारी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर जात आहे, असे सांगितले होते, परंतु आता त्यांनी हा दौरा रद्द केल्याचे घोषित केले. टिकैत देशातील विविध राज्यात महापंचायतींचे आयोजन करणार होते. आधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची सभा घेण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर सभागृहात (इनडोअर) सभा घेण्यास परवानगी मिळाली होती. मात्र सभेला गर्दी होण्याच्या शक्यतेने सभा रद्द करण्यात आल्याचे टिकैत म्हणाले.

कन्हैय्यांचाही हिरमोड!

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 5 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोल्हापुरात स्मृती जागर सभेचे आयोजन करण्यात आली होती. त्यासाठी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार उपस्थित राहणार होते. मात्र कोरोना वाढत असल्याने पोलीस प्रशासनाने या सभेला परवानगी दिली नाही. त्यामुळे कन्हैया कुमारचाही हिरमोड झाला आहे. पुढील काही दिवसांत याच वक्त्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात सभा घेऊ असे गिरीश फोंडे यांनी म्हटले आहे. याची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here