सैनिकांना पाठवल्या जाणाऱ्या दिवाळी फराळाच्या ग्रुप मध्ये रक्षाबंधनाचा मेसेज आला. पाच ठिकाणी भगिनींना जायला हरकत नाही इत्यादी… जम्मू – उधमपूर , भुज , लेह – लडाख , पुणे आणि कुलाबा अशी पाच ठिकाणी ठरली. हळूहळू कोण कुठे जाणार त्यांच्या नावांची यादी तयार होऊ लागली.
तिकडे आमच्या आवाहन पालक संघातील लाडक्या बहिणींनी सैनिक दादांसाठी राख्या बनवायला लगबग सुरू केली. म्हणता म्हणता २००० च्या वर राख्या तयार झाल्या. तर दुसरीकडे आठ हजार पौष्टिक लाडूही तयार होत होतेच. सैनिक दादांना म्हणजेच तेथील ऑफिसर दादांना भेटवस्तू म्हणून कापडी पिशव्या द्यायच्या होत्या त्या पिशव्या रंगविण्याच्या कामात आमच्या या लाडक्या बहिणीं गढून गेल्या. त्यांच्या चिकाटीला , जिद्दीला आणि मेहनतीला तोड नाही हेच खरे.
तर दुसरीकडे प्रत्येक ठिकाणा प्रमाणे ग्रुप बनत गेले. आधार कार्ड नंबर पाठवा इत्यादी बुकिंगची लगबग सुरू झाली. ग्रुप कॉल होऊ लागले. आता आज शेवटचा दिवस आहे ज्यांना आपले नाव द्यायचे आहे त्यांनी आत्ताच द्या, हा मेसेज आल्यावर मी शेवटच्या क्षणी जम्मू-उधमपूरच्या जाणाऱ्या ग्रुप मध्ये माझे नाव घालायला सांगितले.
या ग्रुपमधील आमच्या चौघींचे फोन सुरू झाले. प्रत्येक जण आपला हा कार्यक्रम उत्तम रित्या पार पडावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. केणी काकू आणि केणी काका यांना मी लहान मुलासारखे खूप सारे प्रश्न विचारले. काकू पण तितक्याच तोडीस तोड आम्हांला इथूनच सर्व जबाबदारी कशी घ्यायची आणि बाकी गप्पांमधून आम्हांला स्वावलंबी बनवत होत्याच. “तुम्हाला सर्व मॅनेज करायचे आहे मी फक्त मार्ग दाखवणार असे त्यांनी सांगितले.” त्यामुळे यापुढे आपला संपूर्ण प्रवास हा आपल्या चौघींनाच एकमेकींना सांभाळत करायचा आहे हे कळून चुकले, नी आम्हीही एकमेकींच्या मदतीने सर्व तयारी सुरू केली . प्रत्येकीने आपापल्या परीने आपली जबाबदारी उचलली.
सर्वप्रथम मला केणी काकू , केणी काका , आमच्या शेजारील यश ज्याने आमचे विमानाचे बुकिंग उत्तमरीत्या करून दिले तसेच माझे पती महेश रमेश गोडबोले माझा मुलगा चि. रोहन, माझा भाऊ प्रसाद नातू आणि माझ्या तीन सख्या मीरा, मंदा आणि सुनंदा तसेच माझ्या जवळच्या मैत्रिणी शिवानी , सरिता आणि ज्योतीताई यांचे आभार मानायचे आहेत या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आम्ही हे सुंदर स्वप्न बघून ते सत्यात उतरवू शकलो.
छोट्यात छोट्या गोष्टीचा विचार करून नी बारकाईने तयारी करून शेवटी आम्ही 10 ऑगस्टला विमानतळावर पोहोचलो. अगोदर कधीही न भेटलेल्या आम्ही चौघी एकमेकींशी गप्पा मारत पुढच्या प्रवासाला लागलो. दोन तास फ्लाईट लेट होती त्यामुळे तोही वेळ एकमेकींना समजून घेण्यासाठी वापरता आला . जम्मू विमानतळावर पोहोचलो नी आमचे डोळे आणि मनं आमच्या सैनिक बांधवांना शोधायला लागले . आमचे दोन सैनिक बांधव गाडी घेऊन गेटजवळ तयारचं होते. एक बंदूकधारी सैनिक दादा आणि दुसरे ड्रायव्हर दादा… त्यांना बघून आम्हांला खूप आनंद झाला. अन् जम्मू ते उधमपूर प्रवास सुरू झाला. दीड दोन तासाच्या प्रवासानंतर एका मोठ्या गेट कडे खूप चौकशी विचारपूस इत्यादी प्रक्रिया पूर्ण करून आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो.
त्या क्षणी नकळत चौघींच्याही मनात एकच विचार येऊन गेला की, “गेल्या जन्मी काहीतरी पुण्य कर्म आपण केले असेल म्हणून आज या पावनभूमीवर आपण येऊन उभ्या आहोत ” या सर्व विचाराने अंगावर काटा कधी आला तेही समजले नाही . सर्वत्र भयाण शांतता असली तरी आम्ही आमच्या शूरवीर भावांच्या सानिध्यात सुखरूप आहोत ही जाणीव खूप सुखावणारी होती.
यानंतर झालेल्या आदरातिथ्याने आम्ही भारावून गेलो त्यांच्या वागण्या बोलण्यातून आम्ही येऊन त्यांना सुखद धक्का दिलाय याची खात्री वाटू लागली, कारण याआधी आमच्या मनात आम्ही त्यांना तिथे जाऊन त्यांच्या रुटीन मध्ये डिस्टर्ब करतोय हाच विचार येत होता . आम्हाला आमच्या रूम्स् दाखवण्यात आल्या. दोन भगिनी ज्या रूममध्ये राहणार होत्या त्या रूमचे नाव होते “सियाचीन ” आणि आमच्या रूमचे नाव होते ” छम .” बाकीच्या गेस्ट रूमची नावे होती ” बलिदान, ” त्याग ” इत्यादी ही नावे वाचून नकळत डोळे पाणावलेच. संपूर्ण परिसरात किंवा तुमच्या रूममध्ये तुम्हाला आपण कुठे आलोय याचे भान राहील त्याप्रमाणे त्याची रचना केली गेली होती . हे पर्यटन स्थळ नाही तर एक पुण्य पावन भूमी आहे ज्या भूमीवर शहिदांची संख्या सर्वात जास्त आहे हे वास्तव लक्षात राहावे यासाठी अशी ही योजना करण्यात आली आहे .
फ्रेश झाल्यावर आम्हांला वेध लागले ते आमच्या मुख्य कार्यक्रमाचे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमाचे.. त्या तयारीत आमचा वेळ निघून गेला. रात्री जेवणाच्या वेळी तिथे उपस्थित असणाऱ्या ऑफिसर्सने आम्हांला सांगितले की, “15 ऑगस्ट जवळ आले आहे, त्यात हा अति संवेदनशील एरिया आहे, त्यात हे पँरा कमांडोंचे युनिट आहे , पॅरा कमांडो आपली ओळख सर्वांपासूनच दूर ठेवतात, त्यामुळे तुम्हांला उद्या फक्त दहा ते बारा जणांना राखी बांधता येईल , ना दुसऱ्या युनिट मधून इकडे कोणी येऊ शकेल ना तुम्हाला इथून दुसऱ्या युनिटमध्ये नेता येईल…” या अशा वाक्याने आमचा थोडासा हिरमोड झाला खरा पण या सगळ्याची कल्पना आम्हांला आधीच असल्याने आम्ही त्यांच्या बोलण्याचा आदरच केला.
11 ऑगस्ट 2022 गुरुवार, शेवटी हा आमचा भाग्याचा दिवस उजाडला . रात्रभर चालू असणाऱ्या पावसाने तसेच मध्ये मध्ये खंडित होणारा विद्युत प्रवाह, नवीन जागा , त्यात सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या फायरिंगच्या आवाजाने आमची झालेली दिवसाची सुरुवात अशा विविध नवीन गोष्टींचा अनुभव घेत आम्ही अकरा वाजता आम्हांला भेटणाऱ्या सैनिक बांधवांना सणाचा ‘ फिल ‘यावा म्हणून छान महाराष्ट्रीयन पैठण्या नेसून सर्व तयारी करून तयार झालो . एक गाडी आम्हांला घेऊन एका इमारती जवळ गेली. पाऊस असल्याने छत्र्या , आमच्या बॅग्स आणि साड्या सांभाळत आम्ही गाडीतून उतरलो आणि ..
“” न भूतो न भविष्यती “” असे दृश्य आमच्या “याची देही याची डोळा” ने पाहिले आणि आनंदाश्रूनीही नकळत आपली हजेरी लावली . जवळजवळ 300 च्या वर पॅरा कमांडो चे ट्रेनिंग घेणारे उंच, रुबाबदार , भारदस्त व्यक्तिमत्व असणारे , आणि सळसळणाऱ्या उत्साहाने भारलेली ही मुले / सैनिक बांधव विश्राम च्या स्थितीत (पोझिशन) मध्ये आमची वाट पाहत उभी होती . तसेच त्यांचे सीनियर ऑफिसर ही त्यावेळी हजर होते . 300 च्या आसपास समान वर्दीत शिस्तबद्ध पद्धतीत कसलाही गोंधळ गडबड न करता उभ्या असलेल्या या बांधवांना बघून आम्हीही एक क्षण स्तब्ध झालो .
दुसऱ्या क्षणी त्यांचा अमूल्य वेळ वाया जाऊ नये या विचाराने आमची लगबग सुरू झाली . ताम्हन काढून ते तयार करणे, राख्या काढणे इत्यादी … तयारी करून आम्ही चौघींनी आमच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली . आमच्या प्रत्येकीच्या मदतीला दोन दोन सैनिक भाऊ होतेच तरीही माझी तारांबळ उडत होती .
माझे भाऊ उंच असल्याने त्यांना टीका लावताना , अक्षता लावताना , तसेच डोक्यावर अक्षता वाहताना माझा हात पोहोचत नव्हता आणि माझे भाऊ वर्दित असल्यामुळे त्यांनीही मान खाली करणे उचित नव्हते , शेवटी मीच टाचा वर करून सुवर्णमध्य साधला . एकेकाचे वेगवेगळे चेहरे , त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईल च्या मिशा , तर काही जणांच्या अभिनंदन सरांसारख्या मिशा, तर काहींच्या पीळदार मिशा, त्यांच्या चेहऱ्यावरचे विविध भाव , त्यांनी न बोलताच त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होणारे कृतज्ञतेचे भाव, त्यांची भारी भक्कम मनगटे, त्यावर आम्ही बांधलेल्या राख्या , त्यांनी प्रेमाने दिलेली ओवाळणी आणि काही नमस्कार साठी पुढे झालेले हात ….. हे सर्व शब्दांत व्यक्त होणे फारच कठीण आहे .
” मी गेली सहा वर्षे येथे आहे पण पहिल्यांदाच रक्षाबंधनाच्या दिवशी हातावर आज राखी आहे” …. असं म्हणताना भावनिक होऊनही भावनांचा बांध फुटू न देणे हे उत्तमरीत्या साधणारा आमचा भाऊराया , आपल्या आपल्या बहिणींना शोधणारी त्यांची नजर पाहताना आपण त्यांच्यासाठी इथे आलो याचे सार्थक झाल्याचा आनंद आम्हाला होत होता . भलेही कठोर, कणखर , संयमी असू देत आमचे जवान पण तीही शेवटी माणसेच आहेत त्यांनाही भावना आहेत हा भावनिक धागा नकळत जुळत होता . काही क्षणांसाठी का होईना पण फक्त आणि फक्त “” बहिण -भाऊ “” हे नातं जगत होता. त्या क्षणांची जादू आमच्यावर आयुष्यभर राहील यात शंकाच नाही .
रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपता होत आल्यावर अजून काही सीनियर जवान आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आले. त्यातील एका भाऊरायाची आई दोन दिवसापूर्वीच स्वर्गवासी झाल्यामुळे त्यांनी आमच्या भावनांचा आदर राखत राखीला फक्त नमस्कार केला, आणि आमची हजेरी त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे हेही नमूद केले . असे करता करता चार ते पाच जणांना राख्या बांधल्या पण त्यातील एक जण पुढे येण्यास इच्छुक असूनही ते येत नाही आहेत याचा आम्हाला अंदाज आला.
आम्ही त्यांना “राखी बंधवाई क्या ” ?? असे विचारल्यावर त्यांनी “कहा बंधवाओगे “?? असे आम्हालाच विचारले , आम्ही उत्तर दिले “कलाई पे ” पण त्यानंतर त्यांनी इतका वेळ पाठी करून ठेवलेला हात पुढे केला आणि आमच्या काळजाचा ठोका चुकला . त्यांचा हात एका ग्रेनेड हल्ल्यातील अपघातामुळे मनगटा पासून बोटांपर्यंतचा भाग आता शिल्लक नव्हता म्हणून ते असं म्हणत होते, हे आम्हांला समजले पण आम्हीही जो हात पुढे आला यावर त्यांना राख्या बांधल्या. नी त्यांचे आशीर्वाद घेतले .
असे बरेचसे जवान एखाद्या मिशन दरम्यान जायबंदी होऊनही त्याचा बाऊ न करता आपल्या भारत मातेची निष्ठेने सेवा करत आहेत हे पाहून आमचा उर अभिमानाने भरून आला . सैनिक बांधवांना त्याच दिवशी सकाळी मेसेज देण्यात आला होता की , आज आत्ता अकरा वाजता रक्षाबंधनाचा कार्यक्रम होणार आहे. ना भावांना ना बहिणींना कोणालाच त्या कार्यक्रमाची कल्पना नसल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात ते क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगे होते. आमच्या ध्यानीमनी नसताना आम्हाला नाईन पँरा युनिट कडून मिळालेला हा सुखद धक्का होता जो आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांच्या यादीत सर्वात उच्च स्थानी असणार आहे …
या सर्व सोनेरी क्षणांना कॅमेरात टिपणे नियमबाह्य असल्याने आम्ही फक्त आणि फक्त आमच्या मनात त्याची हजारो छायाचित्रे टिपून घेतली आहेत . जवळजवळ दिड ते दोन तास चाललेला हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपत आला आणि आमची पाऊले तिथून निघायला जड होऊ लागली. परत हा असा क्षण आयुष्यात येईल न येईल या विचाराने मनात चलबिचल होऊ लागली. औक्षणासाठीचे दिवे ही जणू आमची मनस्थिती समजत होते . इतक्या धो धो पावसाच्या वातावरणात – वाऱ्यात त्यांनी आम्हांला उत्तमरीत्या साथ दिली होती . जणू या कार्यक्रमासाठी परमेश्वराचे आम्हांला भरभरून आशीर्वादच मिळत होते याची प्रचिती प्रत्येक क्षणी येत होती . कुठून आलात ?? फक्त आणि फक्त याच कार्यक्रमासाठी- आम्हाला राख्या बांधण्यासाठी इतक्या लांबून आल्यात या सर्व गोष्टींचे आमच्या सैनिक दादांना कौतुकच वाटत होते.
सर्व गप्पा झाल्या आणि आम्ही एकमेकांचे आभार मानून आमच्या गेस्ट रूम कडे जायला निघालो. गेस्ट रूम जवळ असलेल्या चार मोठ्या प्रतिमांनी / पुतळयांनी आमचे लक्ष वेधून घेतले . “नाईन पँरा “मधील चार जणांना अशोक चक्र मिळाले आहे त्या शूरवीर शहिदांचे ते स्मारक आहे, त्यांच्या बहिणी त्यांना दोन दिवस आधीच येऊन राख्या बांधून गेल्याचे आम्हांला सांगण्यात आले, त्या शूरवीरांना कोटी कोटी प्रणाम तसेच त्यांच्या बहिणींनाही शतशः प्रणाम. दरवर्षी न चुकता त्या बहिणी इथे येऊन त्यांच्या बांधवांच्या प्रतिमेला राख्या बांधून जातात.. धन्य ते भाऊ नी धन्य त्या बहिणी …..
त्यानंतर दुपारचे जेवण , जेवताना भेटलेले काही ऑफिसर त्यांच्याशी झालेल्या गप्पा हे सगळं सगळंच अविस्मरणीय ….
संध्याकाळी पाचच्या सुमारास तिथून जवळ असलेल्या अ. ब .क .मॉल मध्ये जाण्याचे ठरवले सोबत म्हणून जवान दादा होतेच. आलोच आहोत तर सहजच एक चक्कर मारूया .. म्हणून थोडेसे फिरणे झाले. थोड्या वेळाने थोडीशी वर्दळ जाणवू लागली. त्यांच्याशी ही ओळख झाली. ते ही इंडियन आर्मीशीच संबंधित आहेत कळल्यावर लगेचच तिकडेही रक्षाबंधन कार्यक्रम सुरू झाला . तिथे भेटलेले डॉक्टर अ.ब.क. यांनी आपल्याला बहिण नाही पण आज चार बहिणी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. मुंबईहून फक्त आणि फक्त आमच्यासाठी तुम्ही इथे आलात याचे त्यांनाही फार कौतुक वाटत होते.
त्यानंतर विविध क्षेत्रातील पण इंडियन आर्मी संबंधित असलेले खूप सारे भाऊराया भेटले. त्यांना राख्या बांधल्या. त्यातील एकाने लगेचच बाजूच्या दुकानातून खूप सारी मिठाई आणून आमचे तोंड गोड केले. खूप साऱ्या गप्पा, फोटो, विचारपूस इत्यादी सर्व झाले मग काही जणांनी ओवाळणी म्हणून आपल्याकडून भेटवस्तू म्हणून केशराच्या डब्या दिल्या . “ना औक्षण ना अजून काही” ..फक्त हातावर बांधलेल्या राख्या तरी त्यांच्यासाठी तो खूप आनंदाचा क्षण होता, त्यांची कृतज्ञता त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून वेळोवेळी जाणवत होती. अगदी सख्या भावाप्रमाणे त्यातील दोन भाऊ आम्हांला गेटपर्यंत सोडायलाही आले . अजून दोन दिवस तुम्ही इथे आहात तोपर्यंत काहीही लागले तर हक्काने सांगा .. इत्यादी म्हणून आम्ही एकमेकांचा जड अंत:करणाने निरोप घेतला.
खूप सार्या सुंदर आठवणींचा, गप्पांचा खजिना सोबत घेऊन आम्ही आमच्या गेस्ट रूम मध्ये आलो .
आजचा दिवसख ऱ्या अर्थाने सार्थकी लागला .. असे आमच्यातील प्रत्येकीला वाटत होते. अशा या असामान्य भावांच्या आम्ही सामान्य बहिणी त्यादिवशी वेगळ्याच आनंदात वेगळ्याच उत्साहात होतो …प्रत्येक बहिणीने हा असा अनुभव नक्कीच घ्यावा .. अन आपल्या सैनिक बांधवांचा कायम आदर राखावा .. तसेच त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपल्याला शक्य असलेल्या मार्गाने वेळोवेळी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवावी.. हे असेच काहीसे छोटे क्षण त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतात हे आम्हांला चौघींनाही अनुभवता आले यासाठी आम्ही परमेश्वराचे मानू तेवढे आभार कमीच आहेत …
” जय हिंद “.
- प्रज्ञा गोडबोले