अयोध्येत राम मंदिराचा (Ram Mandir In Pakistan) प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळा २२ जानेवारी २०२४ ला झाला. यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथे भव्य हिंदू मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. आता पाकिस्तानमध्येही राम मंदिर बांधले जात असल्याचे सांगितले जात आहे. हे पाकिस्तानातील एकमेव राम मंदिर असून, पाकिस्तानातील हिंदू समाजासाठी या मंदिराचे अनन्यसाधारण असल्याचे म्हटले जात आहे. येत्या ६ महिन्यांत या मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून पाकिस्तानातील हे एकमेव राम मंदिर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील डेरा रहीम यार खान परिसरातील माखन राम जयपाल यांनी या राम मंदिराच्या बांधकामाचा एक व्हिडिओ युट्युबवर शेअर केल्याचे म्हटले जात आहे. माखन राम जयपाल यांच्यानुसार, सिंध प्रांतातील इस्लामकोट येथे २०० वर्ष जुने एक राम मंदिर आहे. आजूबाजूच्या परिसरातील हिंदू समाज बांधव या मंदिरात येऊन नियमितपणे पूजन-भजन करत असतात.
स्थानिकांनी केलेल्या दाव्यानुसार, हे पाकिस्तानातील एकमेव असे हिंदू मंदिर आहे, जिथे नियमितपणे पूजन केले जाते. या मंदिराचे बांधकाम खूप जुने झाले आहे. यामुळे या मंदिराला लागूनच नवे मंदिर बांधले जात आहे. जुन्या राम मंदिरातील मूर्ती नवीन मंदिरात स्थापन केल्या जाणार आहेत. या मंदिराच्या बांधकामात मुस्लिम समाजातील युवक सहभागी झाले आहेत.
(हेही वाचा – Paytm Crisis : अखेर विजय शेखर यांचा पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा )
मंदिर बांधण्यात मुस्लिम कामगारांचाही समावेश
माखन राम जयपाल यांनी सांगितले की, मंदिर बांधण्यात मुस्लिम कामगारांचाही समावेश आहे. येत्या सहा महिन्यांत मंदिराची नवीन इमारत बांधली जाईल, अशी आशा आहे. नवीन इमारतीत पूर्ण विधी करून जुन्या मंदिरातील मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. जुन्या राम मंदिरात प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्यासह महादेवांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
पाकिस्तानात स्वातंत्र्यापूर्वी बांधलेली अनेक मंदिरे
राम मंदिर बांधकामात सहभागी झालेल्या एक मुस्लीम कामगाराने सांगितले की, इस्लामकोटमधील संत नेनुराम आश्रम बांधकामातही सहभाग घेतला होता. पाकिस्तानातील हिंदू समाजात या आश्रमाला खूप प्रतिष्ठा आहे. हा आश्रम सुमारे १० एकर जागेवर पसरलेला आहे. त्यात एक मंदिर आणि एक मोठी विश्रांतीची जागा आहे. पाकिस्तानात स्वातंत्र्यापूर्वी बांधलेली अनेक मंदिरे आहेत. मात्र, त्यातील बहुतांश मंदिरांची देखभाल दुरुस्तीअभावी सध्या दुरवस्था झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community