Ram Navami 2023 : श्रीराम जन्मभूमीचा विजय सत्याचा, परंपरेचा!

119

श्रीराम जन्मभूमीचा लढा जगातील सर्वात मोठा होता, हा लढा एका मातीसाठी, भूमीसाठी, व्यक्तीसाठी नव्हता, तर हा लढा एका संस्कृतीसाठी होता. ज्या क्षत्रिय महापुरुषाने राष्ट्राला विचार, संस्कृती दिली, त्या भगवान श्रीरामाकडे पाहून ५ हजार वर्षांपासून अस्मिता जपलेली आहे, त्याआधारे अखिल मानव जातीसाठी मनुष्य जीवनाची संकल्पनाही सांगितली आहे.

एक भारतीय व्यक्ती जेरुसलेम येथे गेली होती, तिथे एक टेम्पल माऊंटला भेट दिली, तेव्हा तिथे फक्त एक भिंतच होती. तेथील स्थानिक यहुदी व्यक्ती त्या भिंतीचे बारकाईने निरीक्षण करताना भारतीय नागरिकाने पाहिले आणि उत्सुकतेपोटी विचारले तेव्हा तो ढसाढसा रडू लागला. कारण त्यांचे धार्मिक स्थळ परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त करून तिथे फक्त भिंत ठेवली होती. त्यांची संस्कृती नष्ट केली होती. तेव्हा तो यहुदी माणूस त्या भारतीय व्यक्तीला ‘तुम्ही श्रीराम मंदिराच्या रक्षणासाठी अतिक्रमण केलेला मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त केला म्हणून तुम्ही भाग्यशाली आहात’, असे म्हणाला होता.

श्रीराम जन्मभूमीचा लढा स्वातंत्र्याचा ‘स्व’

म्हणूनच ५ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील श्रीराम मंदिरावर जो निर्णय दिला, तो सत्याचा, परंपरेचा आणि संविधानाचा विजय आहे. त्यावेळीचा उत्तर प्रदेश आज राहिला नाही. देशाच्या राजकारणाने अनेक वळणे घेतली आहेत, त्यामध्ये श्रीराम मंदिराचा लढा महत्त्वाचा इतिहास आहे. हा इतिहास सगळ्यांसमोर आला पाहिजे. जेव्हा हा लढा पराजीत होणार, असे वातावरण होते. श्रीराम, रामायण आणि श्रीकृष्ण, महाभारत हे कपोलकल्पित आहे असा विचार रुजवला होता, अनेक पक्ष आणि नेत्यांनी तसा द्रोह केला होता. आज परिस्थिती बदलली आहे. दोन दिवसांपूर्वी मी आयोध्येत गेलो होतो, तेव्हा जय श्रीराम असा नारा प्रत्येकाच्या मुखात होता, परदेशी नागरिकही हा नारा देत होते. त्यामुळे राम जन्मभूमीचा लढा हा स्वातंत्र्याचा ‘स्व’ आहे. या भूमीचा ओम कार आहे. इंडोनेशिया देश ९५ टक्के मुस्लिम आहे, तिथे मला श्रीरामाचे महत्व कळले, जपानमध्ये श्रीरामाचे महत्व समजले. या महापुरुषाने स्वातंत्र्यलढ्यातील अनेकांना स्फूर्ती दिली, स्वामी विवेकानंद घडवले, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली, अशा श्रीरामाच्या जय घोषणेमुळे आपण युद्धे लढलो आणि जिंकलो.

(हेही वाचा सुवर्ण मंदिराची पुन्हा एकदा चर्चा; जर्नेलसिंग भिंद्रनवालेनंतर आता अमृतपाल सिंग )

तो हिंदू समाजातील क्रोध होता

ज्यांनी श्रीराम मंदिराला विरोध केला, ती मंडळी याकूब मेमनचे उद्दात्तीकरण करत, अफझल गुरुचे समर्थन करत. ज्या दिवशी बाबराचा सेनापती मीर बाचीने मंदिरावर पहिला हातोडा चालवला, त्या दिवसापासून हे युद्ध पेटले, तेव्हापासून ४ लाख हुतात्मे या युद्धात झाले. जसे पानिपतमध्ये प्रत्येक स्त्रीची बांगडी फुटली होती, तशी १९९२ मध्ये लाखो अबालवृद्ध अयोध्येत जमले होते. अठरापगड जातीचे लोक तिथे जमले होते. त्यावेळी तो त्या समुदायामध्ये क्रोध होता. ज्याने ४० वर्षे देशाला पीडले त्या बाबर, गझनी या आक्रमणकर्त्यांच्या विरोधात तो क्रोध होता. म्हणूनच बाबरने आक्रमण करून बांधलेली वास्तू, मशीद उद्धवस्त करणे अगत्याचे होते.

हिंदू राष्ट्रासाठी प्रेरणा मिळेल

श्रीराम जन्मभूमीच्या लढ्याची परिणीती पाहत आहोत, आज प्रत्येक हिंदू समाज हिंदू राष्ट्राची घोषणा करत आहे. व्यक्तीमध्ये परिवर्तन पाहत आहोत, मुसलमानांना हिंदू धर्माप्रमाणे विचार करण्यास बाध्य करत आहे. आज भव्यदिव्य राम मंदिर उभे होत आहे. आज लव्ह जिहाद, दहशतवादाचे आक्रमण होत आहे. या समस्या संपवण्यासाठी भारत एकसंघ ठेवून ही लढाई लढावी लागेल, त्यासाठी श्रीराम प्रेरणा देणार आहे. हा निर्भयतेचा लढा आहे, यातून भारतीयांची अस्मिता पुन्हा उजळून निघेल. व्हनी तो चेतवावा रे चेतविताची चेततो, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. ही कृती करण्याची ऊर्जा प्रभू श्रीरामाने दिली आहे, त्याआधारे हिंदू राष्ट्रे साकार होईल, असा विश्वास आहे.

लेखक – शंकर गायकर, केंद्रीय सहमंत्री, विश्व हिंदू परिषद.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.