यंदाच्या दिवाळीच्या सणात सुट्टीच्या दिवशी मंगळवारी पाडव्याच्या दिनी अर्थात १४ नोव्हेंबर २०२३ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला (Rani Baug Zoo) एकूण ३९,७९२ पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांच्या या भेटीमुळे महापालिकेच्या तिजोरीत एकाच दिवशी १४, लाख ४१ हजार५२५ रुपये एवढा महसूल प्राप्त झाला आहे. पर्यटकांची संख्या ही ह्या वर्षीच्या दिनांक १ जानेवारी २०२३ पेक्षा जास्त होती, अशी असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
पर्यटकांची संख्या वाढते
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे (Rani Baug Zoo) नूतनीकरण करून या ठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन प्रदर्शनीही निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचे विशेषतः लहान मुलांचे हक्काचे आकर्षण ठरले आहे. कोविड कालावधीत संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले हे प्राणिसंग्रहालय कोविड निर्बंध संपल्यानंतर पर्यटकांसाठी आकर्षणाचे मोठे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढत असून त्यासोबत महसुली उत्पन्नातही वाढ होत आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये विक्रमी संख्या नोंदवली गेली
या वर्षीच्या १ जानेवारी रोजी एकाच दिवशी पर्यटकांची विक्रमी संख्या नोंदवली गेली होती. १ जानेवारी २०२३ रोजी ३९,१०६ पर्यटकांनी भेट दिली होती आणि त्यातून १४,४३,००० रुपये इतका महसूल प्राप्त झाला होता. त्यातुलनेत मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला (Rani Baug Zoo) एकूण ३९,७९२ पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांच्या या भेटीमुळे महापालिकेच्या तिजोरीत एकाच दिवशी १४, लाख ४१ हजार ५२५ रुपये एवढा महसूल प्राप्त झाला आहे. या पूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये विक्रमी संख्या नोंदवली गेली होती. रविवारी, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी एकाच दिवशी तब्बल ३१ हजार २३२ इतक्या पर्यटकांनी भेट दिली. या विक्रमी संख्येमुळे या पूर्वीच्या २९ मे २०२२ रोजीचा विक्रम मागे टाकून या प्राणिसंग्रहालयाने आपल्या शिरपेचात नवीन तुरा खोवला होता. परंतु हाही विक्रम आता मागे पडला आहे. विशेषतः शनिवार-रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या कालावधीत या उद्यान व प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ होत असते.
Join Our WhatsApp Community