महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी रणजित सावरकर यांची निवड

150

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जय कवळी यांनी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रणजित सावरकर यांची रविवारी १९ जून २०२२ या दिवशी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी याबाबतची माहिती दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात ही वार्षिक सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही निवड करण्यात आली. रणजित सावरकर यांनी या बॉक्सिंग संलग्न संघटनांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम केले आहे. त्यांनी मुंबई अमेच्युअर बॉक्सिंग असोसिएशन आणि ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन या दोन संघटनांमध्ये सहा-सहा वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेमध्येही ते बरीच वर्षे कार्यरत आहेत.

रणजित सावरकर यांचे कार्य

रणजित सावरकर हे दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष असून, स्मारकातही बॉक्सिंगसह विविध क्रीडा उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत. स्मारकातील नेमबाजी उपक्रमातील नेमबाजांनी आतापर्यंत ३५० पेक्षा अधिक सुवर्णपदके विविध स्तरावर प्राप्त केली आहेत. स्मारकातील विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप ठेवली आहे.

त्याचप्रमाणे मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूल या सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळेचे ते संचालक आहेत. तेथेही विविध क्रीडाप्रकारांना मोठा वाव त्यांनी दिला आहे. तसेच हॉकीमध्ये ध्यानचंद ट्रॉफीवरही या शाळेने सलग तीन वर्षे आपले नाव कायम राखले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.