रश्मी शुक्लांना होणार का अटक? उच्च न्यायालयाने काय म्हटले? 

पुढील सुनावणीपर्यंत रश्मी शुक्ला यांना अटक करण्यात येऊ नये आणि शुक्ला यांनी मुंबई पोलिसांना चौकशीला सहकार्य करावे, तसेच या आदेशाचा सध्या सुरु असलेल्या सीबीआयच्या तपासावर परिणाम होणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. 

136

फोन टॅपिंग प्रकरणी वादात अडकलेल्या राज्य गुप्तवार्ता पथकाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शुक्ला यांच्या याचिकेवर गुरुवार, ६ एप्रिल रोजी सुनावणी झाली. त्यावेळी राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाला ‘आम्ही रश्मी शुक्ला यांना अटक करणार नाही’, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एक प्रकारे रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणी राज्य सरकारकडून होणारी चौकशी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावेळी अ‍ॅड. महेश जेठमलानी हे रश्मी शुक्लांच्या बाजूने युक्तीवाद करत होते, तर राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. डॅरियस खंबाटा, तर एएसजी अनिल सिंह सीबीआयच्यावतीने युक्तीवाद करत होते. न्यायमूर्ती शिंदे आणि न्यायमूर्ती  पिटले ह्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. डॅरियस खंबाटा यांनी आम्ही रश्मी शुक्ला यांना अटक करू इच्छित नाही, त्यांनी चौकशीला सहकार्य करावे, तसेच त्यांचे म्हणणे व्हिडिओद्वारे रेकॉर्ड करण्यात यावे, असे म्हणाले.

(हेही वाचा : कंगना एकटीच नाही! ट्विटरची कारवाई हेतुपुरस्सर? )

सीबीआयही चौकशी करू शकते! 

त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत रश्मी शुक्ला यांना अटक करण्यात येऊ नये आणि शुक्ला यांनी मुंबई पोलिसांना चौकशीला सहकार्य करावे, तसेच या आदेशाचा सध्या सुरु असलेल्या सीबीआयच्या तपासावर परिणाम होणार नाही,  जर सीबीआयलाही शुक्ला यांची चौकशी करायची असेल, तर तेही करू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले.

दोनदा चौकशीचे मिळालेले समन्स!

सध्या हैदराबाद येथे सीआरपीएफच्या अतिरिक्त महासंचालक पदावर काम करत असलेल्या रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या समन्सला उत्तर दिले आहे. कोरोना संक्रमण पाहता त्या प्रत्यक्षरीत्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या पथकासमोर हजर होऊ शकणार नाही. त्यामुळे चौकशीचे प्रश्न त्यांना मेलवर देण्यात यावेत, अशी त्यांनी मागणी केली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून शुक्ला यांना दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले व त्यांना 3 मेपर्यंत चौकशीसाठी तयार राहण्याचे सुचित करण्यात आले होते. या समन्समध्ये चौकशीसाठी त्यांना त्यांच्या राहत्या घरी उपस्थित राहण्यास मुंबई पोलिसांनी सांगितले होते. या अगोदर 21 एप्रिल रोजी रश्मी शुक्ला यांची तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या शंभर कोटींच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला व शुक्लांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.