स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील ‘लाईट अँड साऊंड शो’ याचे वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील स्फूर्तिदायक प्रसंग दाखवले जातात. भारताला स्वातंत्र्य दिले नाही, तर हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे ब्रिटिशांना भारत सोडणे भाग पडले. नेमके हेच या ‘लाईट अँड साऊंड शो’च्या माध्यमातून सांगितले जाते, जे दर्शकांच्या मनाचा नेमका ठाव घेते. असा हा शो पाहण्यासाठी गुरुवार, १८ मे रोजी राष्ट्रसेविका समितीच्या तब्बल १५० महिला सदस्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हजेरी लावली होती. या प्रसंगी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्याशी संवाद साधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली.
राष्ट्रसेविका समिती ही समाजातील युवतींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देत असते. त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास करत असते. समितीच्या देशभरात शाखा आहेत. मुंबईत राष्ट्रसेविका समितीचे पंधरा दिवसांचे दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग चालू आहे. या वर्गासाठी दोन स्तर असून, प्रथम स्तर प्रवेश व दुसरा स्तर प्रबोध म्हटला जातो. प्रवेशसाठी 72 (कोकण प्रांतातून) आणि प्रबोध साठी 35 प्रशिक्षणार्थी (संपूर्ण महाराष्ट्रातून) उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी 14 शिक्षिका दोन वर्ग अधिकारी आणि व्यवस्थेत वीस सेविका ही या वर्गात उपस्थित आहेत. वर्गामध्ये बौद्धिक आणि शारीरिक प्रशिक्षण विविध आयामातून दिले जाते. संपूर्ण चिंतनाचा, व्यवहाराचा, विचाराचा, आचाराचा, गाभा हा “राष्ट्र सर्वतोपरी” असाच असतो. यासाठी दहावी ते पुढे पदवीधर पदवीधरोत्तर मुली आणि गृहिणी आल्या आहेत. या शिबिरात सहभागी युवती आणि समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. युवतींना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले कार्य समजावे आणि त्यातून त्यांच्यात राष्ट्राभिमान वाढावा या उद्देशासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी दीडशे महिला शिबिरार्थी आणि समितीच्या महिला पदाधिकारी यांनी स्मारकाच्या ‘लाईट अँड साऊंड शो’ पाहिला, अशी माहिती शिबिर अधिकारी सई बेलवलकर व नेत्रा फडके यांनी दिली.
Join Our WhatsApp Community