Ratan Tata No More : टाटा समूहात रतन टाटा यांचे उत्तराधिकारी कोण?

Ratan Tata No More : रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचं नाव रतन टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून आघाडीवर आहे.

108
Ratan Tata No More : टाटा समूहात रतन टाटा यांचे उत्तराधिकारी कोण?
  • ऋजुता लुकतुके

रतन टाटांच्या निधनानंतर भारतीय उद्योग क्षेत्रातील एक पर्व संपलं, असं मानलं जात आहे. पण, त्याचबरोबर चर्चा सुरू झाली आहे की, रतन टाटांचे वारसदार आता कोण होणार? टाटा उद्योग समुहात रतन टाटांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला असला तरी दोराबजी टाटा ट्रस्ट आणि रतन टाटा ट्रस्ट या दोन महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांचे ते अध्यक्ष होते. या संस्थांचं टाटा सन्स आणि समुहामध्ये खूप महत्त्व आहे. या ट्रस्टचंच वर्चस्व टाटा समुहातील कंपन्यांच्या शेअर होल्डिंगवर आहे. (Ratan Tata No More)

आणि इथं रतन टाटांचा वारसा त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा चालवतील असं बोललं जात आहे. किंबहुना रतन टाटा तब्येतीच्या कारणामुळे टाटा समुहातून सक्रिय राहणं टाळत होते तेव्हापासूनच नोएल यांनी एकेक जबाबदारी हातात घ्यायला सुरुवात केली होती. सध्या नोएल रतन टाटा ट्रस्ट आणि दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. टाटा समुहाच्या सर्व धर्मादाय उपक्रमांची देखरेख या ट्रस्ट करतातच. या शिवाय समुहातील कंपन्यांची ६० टक्क्यांच्या वर हिस्सेदारीही या दोन ट्रस्टकडे आहे. या दोन्ही ट्रस्टमध्ये नोएल टाटा सध्या जबाबदारीची भूमिका निभावतात. दैनंदिन कारभारावरही त्यांचं लक्ष असतं. आणि ते पाहिलं तर रतन टाटांनंतर त्यांच्यावर पदाची जबाबदारीही सोपवली जाईल असं दिसतंय. टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडेच पाहिलं जात आहे. (Ratan Tata No More)

(हेही वाचा – Bhagoji Keer, Nana Shankarsheth यांच्या स्मारकांच्या भूमिपूजनाचा मुहूर्तच जुळून येईना)

टाटा समुहात नोएल टाटा यांची सुरुवात २००० साली झाली. त्यानंतर २०१० मध्ये टाटा इंटरनॅशनल्स या कंपनीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. टाटा समुहातील परदेशात असलेल्या कंपन्या आणि व्यवहार यांची जबाबदारी या कंपनीवर आहे. तेव्हापासून नोएल यांना रतन टाटांचे वारसदार म्हणून तयार केलं जात असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण, प्रत्यक्षात २०११ मध्ये रतन टाटांचे उत्तराधिकारी म्हणून नोएल यांचे मेहुणे सायरस मिस्त्री यांची निवड करण्यात आली. पण, सायरस मिस्त्री यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. २०१६ साली टाटा सन्सचे अध्यक्षपदाचाही राजीनामा त्यांच्याकडून घेतला गेला. तेव्हा रतन टाटा पुन्हा एकदा अंतरिम अध्यक्ष झाले. तेव्हाही नोएल यांच्या नावाची चर्चा होती. पण, प्रत्यक्षात नटराजन चंद्रशेखरन अध्यक्ष झाले. (Ratan Tata No More)

पण, याच दरम्यान नोएल यांच्यावरील जबाबदारीही वाढत होती. २०१९ मध्ये त्यांचा अंतर्भाव रतन टाटा ट्रस्टच्या कार्यकारिणी मंडळात करण्यात आला. त्यापूर्वी २०१८ मध्ये ते टायटन कंपनीचे उपाध्यक्ष झाले होते. तर २०२२ मध्ये ते टाटा स्टीलचेही उपाध्यक्ष झाले. या सगळ्या हालचाली त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित करण्यासाठीच होत्या असं बोललं जातं. रतन टाटांच्या तुलनेत नोएल टाटा हे मीडियापासून आणि गर्दीपासून लांब राहणारे आहेत. मीडियाला ते फारसे भेटत नाहीत. आणि मितभाषी आहेत. पण, कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक असतो. त्यांनाही द्रष्टे नेते म्हणून ओळखलं जातं. टाटा समुहात त्यांची आणखी एक ओळख आहे. नोएल यांची पत्नी आलू मिस्त्री ही शापूरजी पालनजी समुहातील पालनजी मिस्त्रींची मोठी कन्या आहे. आहे शापूरजी यांचा टाटा सन्समध्ये सर्वाधिक वाटा आहे. त्यामुळे देखील नोएल यांचं समुहावर वर्चस्व आहे. कारण, मूळात त्यांच्या कुटुंबीयांचं टाटा सन्समध्ये वर्चस्व आहे. नोएल यांची तीन मुलं लीह, माया आणि नेव्हिल यांचाही समावेश यापूर्वीच दोराबजी आणि रतन टाटा या दोन्ही ट्रस्टमध्ये झाला आहे. त्यामुळे टाटा कुटुंबीयात नोएल आणि त्यांचे कुटुंबीय २० वर्षांपूर्वीपासून सक्रिय आहेत. (Ratan Tata No More)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.