‘त्या’ महिलांच्या हाती पडले जीवनाश्यक वस्तूंचे रेशनकिट

तब्बल साडेचार हजार देहविक्री करणाऱ्या महिलांना या रेशनकिटचा उपयोग होणार असून, यामध्ये पारदर्शकता राहावी म्हणून महाधान्य अॅपवर नोंदणी करुनच त्यांना हे किट देण्यात येत आहेत.

118

मुंबईतील देहविक्री करणाऱ्या महिलांची सध्याच्या कडक निर्बंधांमुळे होणारी उपासमार लक्षात घेता, महापालिकेने खासगी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कामाठीपुरा येथील या महिलांना महिन्याभराच्या रेशनचे किट उपलब्ध करुन दिले आहे. या रेशनकिटचे प्रातिनिधीक वाटप अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांचहस्ते करण्यात आल्यानंतर, याच्या वितरणाला सुरुवात करण्यात आली आहे. या भागातील तब्बल साडेचार हजार देहविक्री करणाऱ्या महिलांना या रेशनकिटचा उपयोग होणार असून, यामध्ये पारदर्शकता राहावी म्हणून महाधान्य अॅपवर नोंदणी करुनच त्यांना हे किट देण्यात येत आहेत.

विविध स्तरांतून होत होती मागणी

मुंबईत १५ मार्चपासून लागू करण्यात आलेल्या अंशत: लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या देहविक्री करणाऱ्या महिलांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. या महिलांची होणारी उपासमार लक्षात घेता या घटकाला अन्न पाकिटे किंवा रेशनसामान उपलब्ध करुन देण्याची मागणी विविध स्तरांतून होत होती. काँग्रेसच्या नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन देत देहविक्री करणाऱ्या महिला, तृतीयपंथी आणि गरीब गरजू बेघर नागरिकांना अन्न पाकिटांचे किंवा अन्नधान्याचे वाटप करण्याची मागणी केली होती.

(हेही वाचाः सरकारी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ३५० कोटी रुपयांचे सहाय्य)

साडेचार हजार किट प्राप्त

विविध स्तरांतून होणारी ही मागणी लक्षात घेता महापालिका नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी पुढाकार घेत, विविध खासगी संस्था तसेच कार्पोरेट कंपन्यांकडून मदत प्राप्त करुन या घटकाला वाटप करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कामाठीपुरा येथील १ हजार महिलांसाठी हे रेशनकिट उपलब्ध झाले होते. पण आता साडेचार हजार किट दानशूर संस्थांकडून प्राप्त झाले असून, कामाठीपुरा व ई-विभागातील देहविक्री करणाऱ्या महिलांना या किटचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

नोंदणी करुन होणार वाटप

पहिल्या प्रातिनिधीक किटचे वाटप अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेस नगरसेवक जावेदन जुनेजा आणि शिवसेनेच्या आशा मामुटी व सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे आदी उपस्थित होत्या. पहिल्या दिवशी १०० महिलांना या किटचे वाटप करण्यात आले असून, मंगळवारपासून प्रत्येक महिलेची नोंद आधार कार्डशी लिंक करुन महाधान्य अॅपवर नोंदणी करुन, त्याद्वारे किट दिले जाणार आहे. ई-विभागातील या रेशनकिटचे वाटप नियोजन विभागाच्यावतीने मुख्य समाजविकास आधिकारी भास्कर जाधव आणि मनोजकुमार शितूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक संस्थेच्या मदतीने केले जात आहे.

(हेही वाचाः मुंबईत चाळीशीच्या आतील रुग्णसंख्या दीड महिन्यातच दुप्पट!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.