रत्नागिरीतील आंजर्ले- मुर्डी खाडी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मागच्या दोन वर्षांपासून याचा पाठपुरावा खड्डे निवारण समिती करत आहे. परंतु संबंधित विभागाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप या समितीने केला आहे. या पुलाचे डांबरी रस्त्याचे बांधकाम 8 ऑगस्टपर्यंत सुरु न झाल्यास, 15 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. तसे लेखी पत्रही संबंधीत विभागाला समितीकडून पाठवण्यात आले आहे.
काय लिहिलेय पत्रात?
रत्नागिरीतल आंजर्ले- मुर्डी खाडी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्याचे डांबरीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे असून, या संदर्भात शासनाकडे गेली दोन-चार वर्षे वेगवेगळ्या मार्गांनी निवेदन देऊन पुलाची परिस्थिती मांडली आहे. परंतु याकडे जाणिवपूर्वक सार्वजनिक बांधकाम विभाग दापोली, मु्ख्य कार्यकारी अभियंता चिपळूण- रत्नागिरी, अधिक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी ही जबाबदार खाती आपली जबाबदारी झटकून दुस-याकडे बोट दाखवतात तसेच जाणिवपूर्वक या कामाकडे दुर्लक्ष करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे.
( हेही वाचा: अल-जवाहिरी ठार होताच अल- कायदाचा नवा म्होरक्या सैफ अल- आदेल )
ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
आंजर्ला- मुर्डी खाडी या पुलावरील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम 7 ऑगस्टपर्यंत सुरु न केल्यास, 15 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेचा ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर, ग्रामस्थ प्रत्यक्ष पुलावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलनास सुरुवात करतील व ते डांबरीकरण कामाची सुरुवात होईपर्यंत सुरुच राहिल, असा इशारा दिला आहे. तसेच, या आंदोलनादरम्यान, फक्त अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व वाहतूक- दळणवळणास अटकाव केला जाईल. सदर आंदोलनामुळे जनतेला होणा-या त्रासाचे, असुविधेचे उत्तरदायित्व संबंधित खात्यांवर राहिल, असे या पत्रातून म्हटले आहे.