गणेशोत्सवासाठी लाखो भाविक कोकणात जात असतात. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाच्या दूरवस्थेमुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. यंदाच्या गणेशोत्सवाआधी कोकणवासियांच्या मार्गातील विघ्ने दूर होणार असून, पनवेल ते इंदापूर मार्गाचा पहिला टप्पा लवकरात लवकर पूर्ण करण्यासह गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका सुरू करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामांची पाहणी केली. पळस्पे फाटा, वाखण, इंदापूर-कासू रस्ते आणि घाट बांधकामाच्या स्थितीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर मार्गाचा पहिला टप्पा हा गणेशोत्सवाच्यापूर्वी पूर्ण होऊन एक मार्गिका सुरू होईल, तर डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण मुंबई-गोवा महामार्ग सुरळीतपणे सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला. या रस्त्याच्या कामात असणारे सर्व अडथळे लवकरात लवकर सोडवून हा महामार्ग वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पनवेल येथून या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. तर झारप येथे दौऱ्याची सांगता झाली. भर पावसात अधिकाऱ्यांसमवेत मंत्री चव्हाण यांनी पाहणी केली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, गणेशोत्सवाआधी कोणत्याही परिस्थितीत सिंगल लेन पूर्ण झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करीत आहोत. आम्हाला खात्री आहे की, हे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण होईल. तसेच डिसेंबर पर्यंत दुसरी लेन पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासन अतिशय वेगळ्या पद्धतीने सर्व प्रयत्न करून हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर; राज्य सरकारचा निर्णय)
किती काम पूर्ण झाले?
- मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या पहिल्या टप्प्यामधील ४२ किमी सिंगेल लेन सुस्थितीमध्ये आहे. १२ किमीमधील सिंगल लेनचे व्हाईट टॉपिंग झालेले आहे. उरलेले काम गणपतीच्या आधी पूर्ण होईल.
- उर्वरित कासूपासून ४२ किमीचा रस्ता खराब अवस्थेत आहे. सिटीबीटी या नवीन मशीनने खालचा बेस पूर्णतः काढून चांगल्या पद्धतीने ते काम पुन्हा केले जात आहे.
- सध्या २ मशीन उपलब्ध आहेत. अजून ८-१० मशीन घेऊन ४२ किमीच्या उरलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री चव्हाण यांनी दिले आहेत.
- तसेच वडखळ ते नागोठणेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे
आदेश मंत्री चव्हाण यांनी दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community