RBI Restrictions: रिझर्व्ह बॅंकेने महाराष्ट्रातील ‘या’ दोन बँकांवर लादले कठोर निर्बंध; खात्यातून काढता येणार नाहीत पैसे

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकाबाबत भारतीय रिझर्व्ह बँक सध्या कठोर पाऊले उचलताना दिसत आहे. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने काही बँकांवर पैसे काढण्यासंबंधीत मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे या बँकांपैकी कुठल्याही बँकेत तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने पाच सहकारी बँकांवर कठोर निर्बंध लादले असून यात महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश आहे. बँकांची बिघडत असलेली आर्थिक स्थिती पाहून रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. यासंबंधीत रिझर्व्ह बँकेने निवेदनही जारी केले आहे. पुढील सहा महिन्यांसाठी या पाच सहकारी बँकांवर निर्बंध लागू राहणार आहेत.

कोणत्या बँकेवर कोणते निर्बंध

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, उत्तर प्रदेशातील लखनऊमधील एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक, महाराष्ट्रातील औरंगाबादमधील आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित आणि कर्नाटकातील मांडा, मद्दुर येथील शिमशा सहकारा बँक नियमित या तिन्ही बँकेच्या ग्राहकांना रोखीच्या समस्येमुळे ठेवी काढता येणार नाहीत. तसेच आंधप्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यामधील उर्वाकोंडा को-ऑपरेटिव्ह टाउन बँक आणि महाराष्ट्रातील अकलूजमधील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अशा या दोन बँकेच्या ग्राहकांना पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येईल.

शिवाय रिझर्व्ह बँकेला पूर्वसूचना दिल्याशिवाय या पाचही बँकांना कर्ज देताना येणार नाही आणि गुंतवणूकही करता येणार नाही. तसेच या बँका नवीन दायित्व घेऊ शकत नाहीत. या पाचही सहकारी बँकांचे पात्र ठेवीदार विमा आणि क्रेडिट हमी नियमाप्रमाणे पाच लाख रुपयांपर्यंत जमा विमा दावा रक्कम घेण्यास पात्र असतील. महत्त्वाचे म्हणजे या बँकांना त्यांची मालमत्ता हस्तांतरित करता येणार नाही.

(हेही वाचा – मुंबईतील ३४ टक्के नागरिकांना रक्तदाब; १८ टक्के मुंबईकरांचा उपाशीपोटी वाढतोय मधुमेह)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here