कर्जाच्या रिकव्हरीसाठी अवेळी फोन केला जातोय? तक्रार करा, RBI करणार कारवाई

आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँक खातेधारक बँकेतून कर्ज घेत असतात. या कर्जाचे हप्ते कर्जधारकांना ठरवून दिलेल्या वेळेत भरावे लागतात. हे हप्ते कर्जदारांनी चुकवले तर, ते वसूल करण्यासाठी बँकांकडून रिकव्हरी एजंटची मदत घेण्यात येते. त्यामुळे हे एजंट कर्जदारांना अनेकदा कॉल करुन त्रास देतात. पण आता याची गंभीर दखल RBI कडून घेण्यात आली आहे. अशा पद्धतीने वेळी अवेळी कॉल करुन कर्जधारकांना त्रास देणा-यांवर कारवाई करण्यासाठी आरबीआयकडून पावले उचलण्यात आली आहेत.

(हेही वाचाः EPFO: PF चे व्याज अकाऊंटला जमा झाले की नाही? असा चेक करा बॅलेन्स)

आरबीआयने घेतली दखल

कर्जधारकांना बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून कॉल करुन त्रास देण्यात येतो. त्यामुळे अनेकदा कर्जदारांची मानसिक छळवणूक होते. कॉल करुन वसुली एजंटकडून अपमानास्पद भाषा किंवा गैरवर्तन करण्यात येते. याची आरबीआयने दखल घेतली असून, आरबीयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. अशा पद्धतीच्या कृती या बेकायदेशीर असून, अनियंत्रित वित्त कंपन्या तसेच नियमन केलेल्या कंपन्यांच्या बाबतीतही ग्राहकांकडून अशा तक्रारी येत आहेत.

तक्रार करण्याचे आवाहन

अशा वित्तीय कंपन्यांवर मध्यवर्ती बँक आरबीआयकडून कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. आरबीआयने दिलेल्या नियमावलीनुसार,रिकव्हरी एजंटकडून कर्जदारांना धमकी किंवा छळ देणे हे बेकायदेशीर आहे. कर्जदारांना सातत्याने कॉल करणे तसेच सकाळी 9 च्या आधी आणि रात्री 8 च्या नंतर कॉल करणे त्यांचा छळ करण्याच्या श्रेणीत येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशाप्रकारे कर्जदारांची छळवणूक होत असल्यास त्याची तक्रार करण्याचे आवाहन आरबीआयकडून करण्यात आले आहे.

(हेही वाचाः ट्रेनच्या डब्यांवरील नंबरमधले हे ‘रहस्य’ जाणून घ्या, प्रवासात होईल मोठा फायदा)

अशी होणार कारवाई

कर्जदाराने याबाबतची तक्रार सगळ्यात आधी आपल्या बँकेकडे करावी. त्यानंतर बँकेकडून या तक्रारीची दखल घेणे आवश्यक आहे. 30 दिवसांच्या आत या तक्रारीचे संबंधित बँकेकडून निवारण न झाल्यास बँकिंग लोकपालाकडे याबाबतची तक्रार करता येईल. रिझर्व्ह बँकेकडेही याबाबतची तक्रार करता येऊ शकते. आरबीआयकडून संबंधित बँकेला रिकव्हरी एजंटवर कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले जाऊ शकतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here