यंदाच्या वर्षी मुंबईकरांना भरपेट आंबे खाता येणार, असे चित्र दिसत आहे. दोन वर्षे कोरोनामुळे कोकणातील हापूस आंबे मुंबईत अपेक्षित प्रमाणात पोहचू शकले नव्हते, त्यामुळे मुंबईकर आंब्याच्या सीझनमध्ये आंब्यापासून वंचित झाले होते. मात्र आता कोरोनाही संपला आहे आणि नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची मोठी आवक झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, यंदा भरपूर आणि मनसोक्त आंबे खाण्याची तयारी करा.
यंदा सर्वसामान्यांना आंब्याचा स्वाद घेता येणार
फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यातच अर्थात मंगळवार, १४ फेब्रुवारी रोजी वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये चक्क कोकणातून ९ टेम्पो आले, त्यातून तब्बल ४७९ हापूस आंब्याच्या पेट्या आल्या, तर इतर राज्यातून २ टेम्पो आले आणि त्यातून १०० आंब्याच्या पेट्या आल्या. त्यामुळे यंदा मुंबई आणि महामुंबई येथे आंब्याची विक्री जोरात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये पहिली पेटी आली होती, तिला ५० हजार रुपये भाव मिळाला होता. आता जेवढी आवक झाली आहे, तेवढी आवक एप्रिल महिन्यापासून होत असते, परंतु दोन महिन्याच्या आताच इतकी आवक झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आंब्याचा सिझन सुरु होईल तेव्हा मुंबईत आंब्याची आवक बरीच होईल अशी शक्यता आहे. आवक वाढल्यामुळे दरही कमी होतील, त्यामुळे सर्वसामान्यांना कोकणातील आंबे खाण्याचा आनंद घेता येईल, असे एपीएमसी मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलताना सांगितले.
(हेही वाचा Pulwama Attack : भ्याड हल्ल्याच्या कटू आठवणी)
Join Our WhatsApp Community