मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत एप्रिल महिना ठरला ‘विक्रमवीर’! थक्क करणारी आकडेवारी

मार्च महिन्याच्या जवळपास तिप्पट म्हणजे, सव्वा दोन लाख रुग्णांचा आकडा एप्रिल महिन्यात पार झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत वाढणाऱ्या रुग्णसंख्येने नवा विक्रम नोंदवला आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक म्हणजे सव्वा दोन लाख रुग्ण आढळून आले असून, या एकाच महिन्यामध्ये १ हजार ४५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवरची एकाच महिन्यामध्ये वाढलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. पहिल्या लाटेमध्ये सप्टेंबर २०२० महिन्यात सर्वाधिक म्हणजे ५७ हजार ३३७ एवढे रुग्ण आढळून आले होते. हा विक्रम मागील मार्च महिन्यात मोडीत निघाला. मात्र, मार्च महिन्याच्या जवळपास तिप्पट म्हणजे, सव्वा दोन लाख रुग्णांचा आकडा एप्रिल महिन्यात पार झाला आहे.

अशी आहे एप्रिल महिन्याची आकडेवारी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधील मार्च महिन्यामध्ये एकूण ८७ हजार ९४४ रुग्ण आढळून आले होते. तर २१२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. पण एप्रिलमध्ये हे चित्र दुप्पटीने आणि तिप्पटीने पहायला मिळाले आहे. एप्रिल महिन्यात एकूण रुग्णांचा आकडा हा २ लाख २५ हजार २६४ एवढा झाला आहे, तर मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ही १ हजार ४५७ एवढी आहे. मात्र, एप्रिल महिन्यातील रुग्णांची आकडेवारी ही आजवरच्या मासिक रुग्णसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मागील मार्च महिन्यात ८७ हजार ९४४ एवढे रुग्ण होते. त्या तुलनेत एप्रिल महिन्यात सव्वा दोन लाख रुग्ण आढळून आले.

(हेही वाचाः शाळांमधील लसीकरण केंद्र ‘नापास’!)

चाचण्यांमध्येही नंबर-१

आजवरची ही सर्वात मोठी रुग्ण संख्या असून, सर्वाधिक चाचण्यांचंही प्रमाण याच एप्रिल महिन्यात आढळून आले आहे. सुरुवातीच्या काळात एक लाख चाचण्या करणाऱ्या मुंबई महापालिकेने एप्रिल महिन्यात सुमारे १३ लाख लोकांच्या चाचण्या केल्या आहेत. मार्च महिन्यात एकूण ७ लाख ९१ हजार ४५२ एवढ्या चाचण्या झाल्या होत्या, तर एप्रिलमध्ये एकूण १२ लाख ९४ हजार ६४ एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात चाचण्यांचेही प्रमाण अधिक वाढले असून, सर्वाधिक चाचण्यांची नोंद या एप्रिल महिन्यात नोंदवली गेली आहे.

मृत्यूंच्या बाबतीत टॉप-३

एप्रिल महिन्यात एकूण १ हजार ४५७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. आजवर एकाच महिन्यात सर्वाधिक मृत्यूंची संख्या ही जून २०२०मध्ये ३ हजार २३५ इतकी आहे. त्यानंतर जुलै २०२०मध्ये १ हजार ७२१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा आकडा एप्रिल २०२१मध्ये नोंदवला गेलेला आहे.

एप्रिल महिन्यातील एकूण रुग्णसंख्या: २,२५,२६४

एप्रिल महिन्यातील एकूण मृत्यूसंख्या: १४५७

एप्रिल महिन्यातील एकूण चाचण्या: १२, ९४, ०६४

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here