मुंबईत आतापर्यंतच्या ‘मे’ महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस!

हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

164

तौक्ते चक्री वादळामुळे मुंबईत मागील २४ तासांत कमाल २३० मिमी पावसाची नोंद झाली. आजवर मुंबईत मे महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस रेकॉर्ड ब्रेक ठरला आहे. चक्री वादळामुळे हा विक्रमी पाऊस झाला आहे.

पुढील २४ तास मुसळधार पावसाचे! 

हवामान खात्याच्या माहितीनुसार मागील २४ तासांत सांताक्रूझ येथे २३०.०३ मिमी पावसाची नोंद झाली, तर कुलाबा येथे २०७.६, पालघर येथे २९८, ठाणे ८९.८. मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जरी चक्री वादळाचे संकट गेले, तरी पावसाचे संकट असणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

(हेही वाचा : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रचंड नुकसान! साडेतीन लाख वीज कनेक्शन बंद!)

पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले! 

दरम्यान तौक्ते चक्री वादळ पालघरच्या दिशेने गुजरातकडे पुढे सरकल्यानंतर त्यांचा परिणाम पालघर जिल्ह्यावर १७ मे च्या मध्यरात्रीपासून जाणवत आहे. जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वसई, विरार, नालासोपारा या भागात रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेले असून येथे घराघरांमध्ये पाणी घुसले आहे.

या चक्री वादळात कोकणचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी फळबागा आणि झाडांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या भागातील जनतेचे अर्थार्जन ही या झाडांवर अवलंबून असते. आणि दुर्दैवाने तीच झाले जमीनदोस्त झाली आहेत. पिके नष्ट होतात तेव्हा दुसऱ्या वर्षी लगेच येतात, पण झाडेच उन्मळून पडतात तेव्हा ती नवीन येण्यासाठी ५-६ वर्षे वाट पाहावी लागतात, अशा वेळी कोकणवासीयांची काय करायचे? म्ह्णून या वादळात नुकसान झालेल्या कोकणवासीयांना सरकार आधी प्राधान्याने मदत करणार आहे, त्यानंतर केंद्राकडेही मदत मागणार आहे.
– विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री.

विमानतळ पूर्ववत सुरु! 

दरम्यात १७ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास जेव्हा तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकू लागले तसे मुंबई परिसरात सुटकेचा निश्वास सोडण्यात आला. वादळामुळे दिवसभर मुंबईत विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. रात्री १० वाजता पहिले विमान उड्डाण झाले.

रायगड जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू

‘तौत्के’ चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला होता. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत होते. या दरम्यान चक्रीवादळाच्या परिणामामुळे रायगड जिल्ह्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. निता भालचंद्र नाईक, वय ५० वर्षे, त्या उरण तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा मृत्यू सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडल्याने झाला. सुनंदाबाई भिमनाथ घरत, वय ५५ वर्षे ह्या उरण तालुक्यातील असून त्यांचा मृत्यू सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडल्याने झाला. रामा बाळू कातकरी, वय ८० वर्षे, ते  पेण तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा मृत्यू आंब्याची फांदी अंगावर पडून झाला. रमेश नारायण साबळे, वय ४६ वर्षे, धाकाव एमआयडीसी, रोहा (रा.डोंबिवली, ठाणे) येथील असून, त्यांचा मृत्यू अंगावर झाड पडून झाला. या चारही मृत व्यक्तींची नोंद घेऊन जिल्हा प्रशासनाने पुढील आवश्‍यक ती कार्यवाही पूर्ण केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.