राज्याच्या आरोग्य विभागात 2 हजार 226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरिता 812 नियमित पदे निर्माण करण्यास, तसेच 1 हजार 184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2 हजार 226 पदे भरुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानुसार आता 2 हजार 226 पदांच्या भरतीचा शासन आदेश काढण्यात आला आहे.
काय आहे जीआरमध्ये?
सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशात 2 हजार 226 पदांपैकी काही पदे नियमित, तर काही कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर युनिट येथील पदे भरली जाणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, स्त्री आणि पुरुष परिचालक, लिपिक, कक्ष सेवक, शिपाई, वाहन चालक, सफाई कामगार आदी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
काय म्हणाले होते टोपे?
राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती करणार असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार आहेत. तर क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती करण्याची प्रक्रिया लगेच सुरू होईल, असे टोपे म्हणाले होते. राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागातील विविध खात्यांत भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता 50 टक्के भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. परंतु, राज्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता, आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी अशी मागणी केली.
म्हणून आरोग्य विभागात भरती
येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर यावेळी ताण येण्याची शक्यता आहे. ती शक्यता लक्षात घेऊन राज्यातील भरती प्रक्रिया लवकर राबवणार असल्याचे टोपे म्हणाले होते. सद्यस्थिती लक्षात घेता राज्यातील आरोग्य विभागातील अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती केली जाणार आहे. साधारणपणे भरतीच्या प्रक्रियेचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये होत असतो. पण यावेळी भरतीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. लवकरच मुख्यमंत्री आदेश काढतील, असे टोपे यांनी सांगितले होते.
Join Our WhatsApp Community