महापालिकेच्या विधी विभागातील या ५३ पदांची लवकरच भरती : लवकरच प्रसिध्द होणार जाहिरात

160

मुंबई महापालिकेच्या विधी खात्यातील सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी(श्रेणी २) या दोन पदांच्या रिक्त जागा आता भरल्या जाणार आहेत. सहायक कायदा अधिकारी या श्रेणीतील ३४ पदे आणि सहायक कायदा अधिकारी (श्रेणी २)मधील १९ अशाप्रकारे एकूण ५३ पदांची भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी आयबीपीएस या संस्थेची नेमणूक केलेली असून लवकरच याबाबतची जाहिरात प्रदर्शित करून अर्ज मागवण्यात येणार आहे.

( हेही वाचा : अंगणवाडी सेविकांना दिलासा! मानधनात १५०० रुपयांची वाढ, पेन्शन योजनाही होणार लागू)

मुंबई महापालिकेच्या विधी खात्यातील सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी २) या श्रेणतील रिक्त पदे जाहिरात देऊ सरळसेवेने भरली जाणार आहे. या पदांसाठी जाहिरातील नमुद केलेल्या सेवा प्रवेश निकषांनुसार निश्चित केलेल्या अटी,अर्हता तसेच शर्ती पूर्ण करत असलेल्या पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या ऑनलाईन परीक्षेमध्ये मराठी(२०), इंग्रजी (२०), सामान्य ज्ञान आधारीत प्रश्न(२०), बौध्दिक क्षमता आधारीत प्रश्न (२०) व महापालिका प्रशासनाशी संबंधित घटकांवर आधारीत प्रश्न (१२०) अशाप्रकारे एकूण २०० गुणांचा बहुपर्यायी वस्तूनिष्ठ प्रश्न पध्दतीचा अंतर्भात करण्यात आलेला आहे. या ऑनलाईन परीक्षेमध्ये उच्च गुणवत्तेनुसार व पात्र उमेदवारांच्या मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या योग्य पडताळणीनुसार सरळ सेवेने ही पदे भरली जाणार आहेत.

ही परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी आयबीपीएस या संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे. या परीक्षे प्रक्रियेसाठी सुमारे १ हजार अर्ज अपेक्षित असून त्यानुसार आयबीपीएस या संस्थेला ११ लाख ४१ हजार ६० एवढा खर्च अपेक्षित आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून परीक्षा शुल्क म्हणून मागासवर्ग प्रवर्गाकरता १२२१ रुपये आणि खुल्या प्रवर्गाकरता १३५७ रुपये आकारले जाणार आहे. उमेदवारांकडून अनुक्रमे १२२१ रुपये व १३५७ रुपये शुल्क आकारले जाणार असले तरी प्रत्यक्षात एका जागेच्या भरती प्रक्रियेसाठी २१ हजार १३० रुपये महापालिका आयबीपीएस या संस्थेला मोजणार आहे.

यापूर्वी विधी खात्यातील सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी२) या श्रेणीतील रिक्त पदे भरण्यासाठी सन २०१६ व २०१७मध्ये ऑनलाईन प्रक्रिया महापालिकेच्या निकषांनुसार यशस्वीरित्या राबवून भरती प्रक्रियेचे कामकाज समाधानकाररित्या पूर्ण केले आहे. त्या या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी महापालिकेच्या परिपत्रकातील शासन निर्णयानुसार आयबीपीएस या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या दोन्ही पदांच्या रिक्त जागा आणि महापालिकेतील न्यायालयीन दाव्यांची संख्या वाढत असल्याने दावे निकाली काढण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने तसेच न्यायालयाकडून महापालिकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत असल्याने तसेच मनुष्यबळाअभावी दावे महापालिकेच्या विरोधात जात असल्याने ही पदे तात्काळ भरण्याची आवश्यकता असल्याचे विधी विभागाचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.