पुणे महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी पुढील महिन्यात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पुणे पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी प्रशासक तथा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
( हेही वाचा : मस्तच! आता तुम्हाला कधीही उरकता येणार बॅंकांची कामे )
समिती स्थापन
पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यासाठी बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती प्रत्येक विभागातील रिक्त पदांची माहिती एकत्रित करेल, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. त्यानंतर प्रत्यक्षात किती जागा रिक्त आहेत, रिक्त पदे कोणती आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील महिन्यात भरती
ही भरती प्रक्रिया परीक्षा पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे. परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेला नियुक्त करायचे का, प्रश्नपत्रिका कोणी तयार करायची, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरु आहे. पुढील महिन्यात भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community