पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

118

राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद येथे दिली. तसेच शहरातील टी.व्ही.सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे दोन दिवस औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. टी.व्ही.सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अभिवादनप्रसंगी उपस्थित जनसमुदायाशी त्यांनी संवादही साधला. या पुतळ्याच्या सुशोभिकरणासह परिसरासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. या प्रक्रियेसंदर्भात मुख्य सचिव आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसोबत आपली चर्चा झाली असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित असणाऱ्या तरुणांशी त्यांनी अनौपचारिक संवादही साधला. या पोलीस भरतीमुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.

( हेही वाचा: तपास यंत्रणांचा दुरुपयोग; सभागृहात चर्चा व्हावी, प्रियांका चतुर्वेंदीचे राज्यसभा अध्यक्षांना पत्र )

‘या’ मान्यवरांची उपस्थिती 

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, भडकल गेट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, अतुल सावे आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.