मुंबईत वेधशाळेच्या अंदाजाचा फज्जा, अतिवृष्टी नाहीच

सोमवारी दुपारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने मुंबईत अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला. सोमवारी दिवसभरात पश्चिम उपनगरातील उत्तर भाग आणि दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरातच पावसाचा जोर पाहायला मिळाला. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने मंगळवारीही मुंबईसाठी अतिवृष्टीच राहील मात्र रेडऐवजी ऑरेंज अलर्ट राहील, असा अंदाज दिला आहे.
दक्षिण मुंबईत मुंबई महानगर कार्यालय परिसरात २४.३६ मिमी तर पश्चिम उपनगरांत मालवाणी अग्निशमन केंद्रात २०.४ मिमी पाऊस झाला. दक्षिण मुंबईतील वेधशाळेच्या कुलाबा स्थानकांत दिवसभरात केवळ १९ मिमी पावसाची नोंद झाली. तर मुंबई विमानतळानजीकच्या वेधशाळेच्या स्थानकांत केवळ ८ मिमी पाऊस होता. मलबार हिल परिसर, मरोळ, चेंबूर, देवनार, अंधेरी, सायन आदी परिसरांत केवळ शिडकाव्यांसह पावसाची काही मिनिटांसाठी हजेरी सुरु होती. कांदिवली, दहिसर, बोरिवलीतील गोराई परिसरात पावसाचा थोडाफार जोर दिसून आला. केवळ पावसाच्या संततधारेने कमाल तापमानात घट दिसून आल्याने, उन्हाच्या दाहापासून सोमवारी मुंबईकरांना विश्रांती मिळाली. सांताक्रूझ येथे २८.१ अंश सेल्सिअस तर कुलाबा स्थानकांत २७.६अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here