मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने शुक्रवारी दुपारी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसह विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांना अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यातील बहुतांश भागात शुक्रवारपासून विजेच्या कडकडाटांसह मेघगर्जनेला सुरुवात होईल. पालघर, ठाणे आणि रायगड येथील काही भागात २०० मिमीहुन अधिक तर पुणे, सातारा येथील घाट परिसरात २०० मिमीपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटांसह २०० मिमीपेक्षाही जास्त पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक परिसरातील घाट परिसरात प्रवास टाळा, या भागात भूस्खलनाची शक्यता असल्याचा इशारा भारतीय वेधशाळेने केले आहे.
येत्या दोन दिवसात पाऊस पुन्हा रौद्ररूप घेईल. कोकणात विकेंडलाही पावसाचा धुमाकूळ सुरु असेल. उत्तर कोकणात दोन दिवसांच्या पावसामुळे बदलापूर, कल्याण आणि भिवंडी शहरातही पाणी साचले. रायगड येथील बहुतांश नद्यांना पूर आला असताना मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्याचा काही भाग खचल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून आले. रायगडातील पाली पूलाचा रस्ता काही प्रमाणात खचला.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने नजीकच्या भागात पाणी आल्याचे गुरुवारी सायंकाळपासून दिसून आले. नांदेड जिल्हयातील काही भागात गुरुवारी आणि शुक्रवारी १०० मिमी पर्यंतचा पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील जनजीवनही विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे. सिंधूदुर्ग जिल्हातील कुडाळ जिल्ह्यातील भातशेती पाण्याखाली गेली.
इशारा –
- घाट परिसरात भूस्खलनाची आणि दरड कोसळण्याची शक्यता.
- पूर येण्याची शक्यता.
- सखल भागात पाणी साचणे.
- रेल्वे ट्रेकवरही पाणी येण्याची शक्यता.
- जुन्या इमारतींचे नुकसान होण्याची शक्यता.
काय काळजी घ्याल –
गरज नसेल तर प्रवास टाळा. घराबाहेर पडण्यापूर्वी प्रशासकीय यंत्रणांकडून वाहतुकीच्या सद्यस्थितीची माहिती घ्या. झाडाखाली उभे राहणे किंवा बसणे टाळा.
Join Our WhatsApp Community