मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील या जिल्ह्यांना दिलेला अतिवृष्टीचा अंदाज ठरला फोल

सोमवारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने राज्यातील विविध भागांत अतिवृष्टीसाठी दिलेला रेड अलर्ट फोल ठरला. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याव्यतिरिक्त पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरात तर विदर्भात गडचिरोलीत अतिवृष्टीएवढा पाऊस झालाच नाही. तरीही मंगळवारी पालघर, रायगड, पुणे, नाशिक तर विदर्भात गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत अतिवृष्टी होईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या नोंदीत कोकणातील अलिबाग येथे राज्यभरातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. अलिबाग येथे ७५ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरला ७० मिमी, तर विदर्भात अमरावतीत ६५ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पावसाची नोंद पुण्यात लोहगावला केवळ ३ मिमी एवढीच झाली. कोकणात अलिबागनंतर केवळ रत्नागिरीत दिवसभर पाऊस सुरु होता. मात्र केवळ ५७ मिमी पावसाची नोंद झाली. संपूर्ण मध्य महाराष्ट्र पट्ट्यात महाबळेश्वरनंतर केवळ कोल्हापूरात पावसाचा जोर सुरु होता. कोल्हापूरात ४२ मिमी पाऊस झाला. विदर्भात अमरावतीनंतर पावसाची कुठेच दखल घेण्याइतपत कामगिरी नव्हती. मराठवाड्यात तर पावसाचा पत्ताच नव्हता.
( हेही वाचा:मुंबईत वेधशाळेच्या अंदाजाचा फज्जा, अतिवृष्टी नाहीच )

  • सोमवारी गोंदिया जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. गोंदियात ३१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. 
  • सोमवारी महाबळेश्वरला राज्यातील निच्चांकी किमान तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरला किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअस होते.

मंगळवारी या जिल्ह्यांना अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट

ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, नांदेड, अमरावती, भंडारा, नागपूर, वर्धा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here