एचआयव्ही तथा एड्सबाबत युवकांमध्ये खेळाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेतर्फे महाविद्यालयीन युवा वर्गासाठी ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धा घेण्यात आली. युवकांमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाचा अजित यादव तर युवतींमध्ये झुनझुनवाला महाविद्यालयाची सोनी जैसवाल यांनी पहिला क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना नवी दिल्लीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेतर्फे गोवा येथे होणाऱ्या ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था ही मुंबई महानगरपालिका संचलित संस्था असून राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या (नॅको) मार्गदर्शक नियमावलीनुसार मुंबईमध्ये एचआयव्ही तथा एड्स नियंत्रणासाठी ही संस्था कार्यरत आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे यांच्या सुचनेनुसार या वर्षीही एचआयव्ही/एड्स बाबत जनजागृती करण्याकरीता मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेतर्फे मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘रन फॉर एण्ड एड्स’ अंतर्गत वडाळा येथे रविवारी १० सप्टेंबर २०२३ ‘एमडॅक्स रेड रन मॅरेथॉन स्पर्धा’ घेण्यात आली. या स्पर्धेत ५५० महाविद्यालयीन युवक-युवतींनी सहभाग घेतला. तर, राष्ट्रीय सेवा योजनेचे १५० स्वयंसेवक मॅरेथॉन मार्गावर कार्यरत होते. महानगरपालिकेचे उप आयुक्त तथा मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक रमाकांत बिरादार यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.
(हेही वाचा – Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवातील विशेष 6 गाड्यांमध्ये एकूण 16 डबे वाढवणार)
याप्रसंगी उपायुक्त बिरादार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, युवकांनी युवा दूत बनून आपल्या महाविद्यालयांमध्ये, समाजामध्ये एचआयव्ही/एड्स बाबत जनजागृती करावी. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (नवी दिल्ली) यांच्याकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनेनुसार संपूर्ण मुंबईत महाविद्यालयीन युवकांकरीता व शालेय विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत युवक गटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सिद्धार्थ कॉलेजच्या अजित यादव याने प्रथम, सिद्धार्थ कॉलेजच्याच विष्णू यादव याने द्वितीय तर मालाड पश्चिम येथील प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेजच्या मुकेश यादव याने तृतीय क्रमांक पटकाविला.
युवती गटामध्ये घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयाच्या सोनी जैसवाल हीने प्रथम, चेंबूर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या मेघा खोत हीने द्वितीय तर गिरगाव चौपाटी येथील विल्सन महाविद्यालयाच्या समारा डिसोझा हीने तृतीय क्रमांक पटकाविला. रमाकांत बिरादार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजयकुमार करंजकर, उप संचालक (माहिती शिक्षण संपर्क) उमेश घुगे यावेळी उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना नवी दिल्ली येथील राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्स्था (नॅको) मार्फत राष्ट्रीय पातळीवरील गोवा या ठिकाणी ८ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात येणा-या रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community