मुंबई महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडकरता प्राप्त झालेल्या देवनार येथील ६०० टेनामेंट जमिनीची मालकी कुणाची यावरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र शासनाने ही जागा महापालिकेला दिली असली, तरी मालमत्ता पत्रकावर महापालिकेचे नाव नाही. त्यामुळे महापालिका आणि राज्य शासनामध्ये सुरु असलेल्या न्यायालयीन लढाईनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सिमांकन केले जाणार आहे. जागेच्या प्रत्यक्ष वापरासंदर्भात केल्या जाणाऱ्या सिमांकनाचा खर्च महापालिकेला करावा लागणार असून, यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. ही सर्व दीड कोटींची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झाल्यानंतर, या भूभागाचे सिमांकन केले जाणार आहे.
याचिका प्रलंबित
एम पूर्व येथील देवनार येथे महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडकरता शासनाकडून जमिन प्राप्त झाली हाती. ही जागा तब्बल ५८५ एकर ९ गुंठे एवढी असून, यावर कुणाची मालकी आहे यावरून वाद सुरु आहे. देवनार येथील या जागेवर ६०० टेनामेंट असून, या कर्मचारी निवासस्थाने व प्रकल्पबाधित व्यक्तींकरता सदनिकांचे बांधकाम करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असता, मालमत्ता पत्रकावर महापालिकेचे नावच नसल्याची बाब समोर आली. मालमत्ता पत्रकावर महापालिकेचे नाव वगळून ही जागा शासनाकडे वर्ग केली असल्याने, महापालिकेने महाराष्ट्र शासन विरुध्द मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. ही रिट याचिका प्रलंबित आहे.
( हेही वाचा: नवाब मलिकांचे मौन ठरणार मुलासाठी अडचणीचे… )
सविस्तर अहवाल बनवा
दरम्यान महापालिका आयुक्तांनी २२ एप्रिल २०२० रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून महापालिकेला कर्मचारी निवासस्थाने व प्रकल्पबाधितांसाठी सदनिकांचे बांधकाम करण्यासाठी या प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शासन जमा झालेले सुमारे ५८५ एकर ९ गुंठे जमिनीबाबत सद्यस्थिती नेमकी काय आहे हे स्पष्ट होण्यासाठी १४ मोजणी करण्याचा निर्देश दिले. यामध्ये जमिनीचा नेमका वापर कसा होतो आणि किती जमीन प्रत्यक्षात मोकळी आहे याचा सविस्तर अहवाल बनवण्याचे आदेश देण्यात आले.
असे केले जाणार सिमांकन
जिल्हा अधिक्षकांनी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा, असे सांगत यासाठी भूभागाचे सिमांकन करण्यासाठी येणारा खर्च महापालिकेने अदा करावा, असे निर्देश दिल होते. त्यानुसार महापालिकेने याची प्रक्रिया सुरु केली असून, याबाबत १ कोटी ५४ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम घाटकोपर येथील नगर भू -मापन अधिकारी यांच्याकडे जमा केल्यानंतर हे सिमांकन केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community