प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णालय बंद, कोविड केंद्रावरच मुलुंडकरांची मदार!

जर महापालिकेचे एम.टी.अगरवाल रुग्णालय आतापर्यंत सुरू झाले असते, तर मुलुंडकरांना कोविड सेंटरऐवजी या सुसज्ज अशा रुगणालयात उपचार घेता आले असते.

138

वाढत्या कोविड रुग्णांचा भार कोविड केअर सेंटरवर पडत असून आता खाजगी रुग्णालयांसह महापालिकेची कोविड सेंटरही कमी पडू लागली आहेत. मुलुंड येथील कोविड सेंटरमध्येही ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये येथील सेंटरमधील मृत्यूचाही आकडा वाढू लागला आहे. मुलुंडमध्ये महापालिकेचे एम.टी.अगरवाल रुग्णालय असून, त्याचा पुनर्विकास मागील दहा वर्षांपासून रखडला आहे. जर हे रुग्णालय आतापर्यंत सुरू झाले असते, तर मुलुंडकरांना कोविड सेंटरऐवजी या सुसज्ज अशा रुगणालयात उपचार घेता आले असते. पण सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या रुग्णालयाच्या विकासाचे काम धिम्या गतीने सुरू असून, त्याचा फटका मुलुंड-भांडुपसह कांजूरमार्गच्या नागरिकांना बसत आहे.

४५७ कोटी रुपयांचे कंत्राट

मुलुंड येथील महापालिकेच्या एम.टी.अगरवाल रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, मागील पाच वर्षांपासून या रुग्णालयाचा विकास, निविदा प्रक्रियेत अडकला होता. त्यामुळे वारंवार निविदा काढूनही याला प्रतिसाद मिळत नव्हता. २ ते ३ वेळा फेरनिविदा काढल्यानंतर महापालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा ५० टक्के अधिक दराने कंत्राटदाराने बोली लावल्याने तत्कालीनअतिरिक्त आयुक्त आय.ए.कुंदन यांनी ही निविदा रद्द करुन फेरनिविदा मागवली. या फेरनिविदेत मलानी कन्स्ट्रक्शन ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीला ४५७ कोटी रुपयांचे कंत्राट काम मार्च २०१९ मध्ये देण्यात आले.

(हेही वाचाः आता लालपरीचे कर्मचारी पुरवणार महाराष्ट्राला ‘ऑक्सिजन’! कसा? वाचा…)

फक्त पायलिंगचे कामच पूर्ण

या रुग्णालयाच्या पुनर्बांधणीत तळघर, तळमजला अधिक वरील मजल्यासह १० मजल्यांची इमारत आणि १० मजल्यांची स्वतंत्र इमारत अशाप्रकारे २ इमारतींचे बांधकाम होणार आहे. जुन्या इमारती पाडून त्याजागी या इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. त्यानुसार या रुग्णालय इमारतीचे काम सुरू असून, आजमितीस या रुग्णालयाच्या पायलिंगचे कामच पूर्ण झाले आहे.

ऑक्सिजन आणि आयसीयू अभावी रुग्णांचे मृत्यू

मात्र, मागील मार्च महिन्यापासून कोविड आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर, या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुलुंड येथे जंबो कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. मुलुंड परिसरातील लालबहादूर शास्त्री मार्गालगतच्या जागेत १७०० खाटांचे समर्पित कोरोना आरोग्य केंद्र सिडकोच्या पुढाकाराने उभारण्यात आले. मागील काही महिन्यांपासून या केंद्राची देखभाल पूर्णपणे महापालिकेच्यावतीने केली जात आहे. या केंद्रात १०० आयसीयू आणि इतर काही ऑक्सिजन बेड आहेत. तरीही १६ एप्रिल २०२१ रोजी याठिकाणी १४ रुग्णांचा मृत्यू झाला. तर त्या आधीच्या दोन दिवसांमध्ये अनुक्रमे ५ व ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजन आणि आयसीयू अभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत.

(हेही वाचाः दुसरी लाट, पण प्रशासनाला का नको नगरसेवकांची मदत?)

प्रकाश गंगाधरे यांचा आरोप

यासंदर्भात बोलताना मुलुंडमधील भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कितीही झाले तरी जंबो कोविड सेंटर ही तात्पुरती व्यवस्था आहे. पण या तुलनेत जर एम.टी.अगरवाल रुग्णालयाचे बांधकाम जर मागील पाच वर्षांत पूर्ण केले असते, तर या केंद्राची गरज भासली नसती. मागील दहा वर्षांपासून या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. यासंदर्भात आपण स्वत: तसेच भाजपचे तत्कालीन खासदार किरीट सोमय्या यांनी आंदोलन केले होते. पण त्या आंदोलनानंतरही पाच वर्षे या रुग्णालयाच्या पुनर्विकासाला गतीच देण्यात आली नाही. दोन वर्षांपूर्वी याची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन प्रस्ताव मंजूर झाला. पण आजतागायत पायाचेच काम पूर्ण होऊ शकले. म्हणजे मागील दहा वर्षांपासून मुलुंडमध्ये नवीन रुग्णालय उभारणीचे सोडा अस्तित्वात असलेल्या रुग्णालयालाही बंद करण्यात आल्याचा आरोप, गंगाधरे यांनी केला. मुलुंडच्या आसपास असलेल्या खाजगी रुग्णालयांना मदत करण्यासाठीच या रुग्णालयाच्या पुनर्विकास कामाला विलंब करण्यात आला असल्याचा आरोप गंगाधरे यांनी यापूर्वी केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.