कोरोनामुळे विस्कळित झालेली शिक्षण प्रक्रिया ध्यानात घेता अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या २०२२ च्या अंतिम परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थांसाठी विशेष बाब म्हणून सप्टेंबर महिन्यात फेर परीक्षा घेण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधिमंडळात केली.
( हेही वाचा : मनसे झाली जागी… मनसैनिक आता म्हणणार मी हिंदवी रक्षक)
शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टीने अपवादात्मक स्थितीत विद्यार्थ्यांना एक अधिकची संधी देण्याच्या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे योग्य आकलन व्हावे यासाठी संस्था स्तरावर मार्गदर्शन करणारे ‘रेमेडिअल कोचिंग’ किंवा ‘ब्रिज कोर्स’ घेण्याचे आदेशही सर्व संस्थांना देण्यात येतील.
फेरपरीक्षेची कारणे काय?
- राज्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या स्वायत्त मंडळाद्वारे आयोजित केल्या जातात.
- कोरोनाच्या महासाथीमुळे तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षा २०२०, हिवाळी परीक्षा २०२०, उन्हाळी परीक्षा २०२१ व हिवाळी परीक्षा २०२१ या चार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या होत्या.
- त्यानंतर प्रथमच उन्हाळी २०२२ ही परीक्षा प्रचलित ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली व तिचा निकाल २९ जुलै रोजी जाहीर केला आहे.
- या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी यासाठी काही विद्यार्थी, संस्था आणि संघटनांची निवेदने तंत्रशिक्षण मंडळाकडे आली होती. या पार्श्वभूमीवर निर्णय जाहीर करण्यात आला.