Barsu Refinery : रिफायनरी बारसूऐवजी सिंधुदुर्गमध्ये? तिसऱ्या पर्यायाची चाचपणी; दोडामार्गमध्ये १ हजार ८०० एकर जागा उपलब्ध

हा प्रकल्प रत्नागिरीतून स्थलांतरित होऊन तळकोकणात दोडामार्ग गोव्याच्या सीमेवर होण्याची दाट शक्यता आहे. औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) त्याबाबत हालचाली सुरू आहेत.

584
– सुहास शेलार

राजापूरच्या बारसू-सोलगावमध्ये रिफायनरीला तीव्र विरोध झाल्यानंतर राज्य सरकारकडून तिसऱ्या पर्यायाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्र-गोवा सीमेवरील दोडामार्ग तालुक्यात जागेची पडताळणी केली जात असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात नाणारमध्ये विरोध झाल्यानंतर ग्रीन रिफायनरी प्रकल्प बारसू-सोलगाव येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बारसूमध्ये २४ एप्रिलपासून या प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र हा प्रदूषणकारी प्रकल्प असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. माती परीक्षणावेळी पोलिसी बळाचा वापर झाल्याने विरोधाची धार तीव्र होत गेली. हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यामुळे देशभर रिफानरी विरोधाचे चित्र पोहोचले.

दुसरीकडे, रिफानरी होऊ घातलेल्या परिसरात सरकारी अधिकारी आणि परप्रांतीयांनी जमीन खरेदी केल्याचे उघडकीस आल्याने नकारात्मक वातावरणात आणखी भर पडली. शिवाय बारसूमधील एका कातळशिल्पाचा समावेश युनेस्कोच्या प्राथमिक यादीत झाल्याने या प्रकल्पाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता रिफायनरी प्रकल्प दामटवल्यास आगामी निवडणुकांत फटका बसू शकतो, हे ध्यानात घेऊन राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तिसऱ्या पर्यायाची चाचपणी सुरू केल्याचे कळते. त्यामुळे आता हा प्रकल्प रत्नागिरीतून स्थलांतरित होऊन तळकोकणात दोडामार्ग गोव्याच्या सीमेवर होण्याची दाट शक्यता आहे. औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) त्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र कोकणातील जनतेचा एकूण विरोधचा सूर पाहता सरकारने याबाबत गोपनीयता पाळली असून अंतिम निर्णय होईपर्यंत अधिकृतपणे जाहीर केले जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कातळशिल्पांमुळे अडथळा

बारसू-सोलगावमधील स्थानिक रहिवाशांशी चर्चा करून रिफायनरीबाबत तोडगा काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असला, तरी कातळशिल्पांमुळे नवा अडसर निर्माण झाला आहे. कोकणात किंबहुना राजापूर तालुक्यात बहुतांशी कातळांवर शिल्पे आहेत. बारसूमधील एका कातळशिल्पाचा समावेश तर युनेस्कोच्या प्राथमिक यादीत झाला आहे. कातळशिल्पांच्या संवर्धनाबाबत अनेक संस्था कार्यरत असून या संस्थांच्या माध्यमातून हजारो पर्यटक प्रतिवर्षी कोकणात येतील व येथील शेतकऱ्यांच्या अर्थार्जनात वाढ होईल, शिवाय पर्यावरणही सुरक्षित राहील, असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे रिफायनरीबाबत राज्य शासन कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

भूसंपादनाचा प्रश्न उद्भवणार नाही!

नारायण राणे उद्योगमंत्री असताना त्यांनी सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यात आडाळी या ठिकाणी एमआयडीसी आणली होती. मात्र, आतापर्यंत एकही मोठा प्रकल्प न आल्याने येथील १ हजार ८०० एकर जागा ओसाड पडून आहे. एमआयडीसीच्या मालकीची ही जागा रिफायनरीसाठी वापरल्यास भूसंपादनाचा प्रश्न उद्भवणार नाही. शिवाय येथून गोव्यातील सागरी किनारपट्टी २० किमी अंतरावर आहे. त्यामुळे रिफायनरीसाठीचे सर्व निकष पूर्ण होत असल्याने बारसू-सोलगावला पर्यायी जागा म्हणून दोडामार्गचा विचार केला जात असल्याचे कळते.

रिफायनरी प्रकल्प नेमका काय आहे?

  •  ही ‘जगातली सर्वात मोठी रिफायनरी’ असेल. हा प्रकल्प  केंद्र सरकारच्या आखत्यारितील तीन तेल कंपन्या आणि दोन परदेशी कंपन्यांमधील ५०: ५० अशी संयुक्त भागीदारी आहे.
  • त्यात भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या आणि सौदी अरेबियाची राष्ट्रीय कंपनी सौदी अरामको आणि संयुक्त अरब अमिरातीची अबु धाबी नॅशनल ऑईल कंपनीचा समावेश आहे.
  • दरवर्षी ६ कोटी मेट्रिक टन तेल उत्पादनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी एकूण ३ लाख कोटी रुपये खर्च येईल. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि संपूर्ण प्रदेशाचा विकास होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.