BMC : परवाना पद्धतीत सुधारणा; महापालिकेने नेमली ९ जणांची समिती

1652

नागरिक तसेच व्यवसायिकांना अनुज्ञापनांबाबत येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात व प्रचलित पद्धतीमध्ये सुधारणा करून प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणून अनुज्ञापने देण्याच्या पद्धतीत कालसुसंगत आमूलाग्र बदल करता यावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नऊ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. महानगरपालिका उपआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या वतीने नागरिक तसेच व्यवसायिकांना त्यांच्या विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी तसेच प्रयोजनांसाठी अनुज्ञापन (परवाना) दिले जातात. त्यामुळे नागरिकांना मुंबईत व्यवसाय करता येतो. परंतु, परवाना देण्याच्या प्रक्रियेत अडचणी येतात, परवाने विहित मुदतीत मिळत नाहीत, अशा आशयाच्या तक्रारी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे, आयकर विभाग तसेच पासपोर्ट विभागामध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेच्या धर्तीवर महानगरपालिकेतील परवाना देण्याची प्रक्रिया सुलभ आणि अद्ययावत व्हावी, यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश डॉ. शिंदे यांनी दिले आहेत.

(हेही वाचा Tomato : टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याची केंद्राची NCCF – NAFED ला सूचना)

महानगरपालिकेचे कामकाज अधिकाधिक लोकाभिमुख आणि सुलभ व्हावे, यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय सुलभता (इझ ऑफ डुइंग बिझनेस) ला मागील काही वर्षांत चालना देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून आता महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या विविध अनुज्ञापनांची (परवाना) प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. महानगरपालिकेची विविध अनुज्ञापने (परवाना) देण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी तसेच प्रक्रिया सोपी, सुटसुटीत आणि अधिक पारदर्शक करण्यासाठी ९ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. शिंदे यांनी नियुक्ती केली आहे. यामध्ये महानगरपालिका उपायुक्त(परिमंडळ ४) विश्वास शंकरवार हे समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील. तर उपायुक्त (विशेष) संजोग कबरे, उपायुक्त(सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) सुनील राठोड, प्रमुख अधिकारी (व्यवसाय विकास) शशी बाला, प्रभारी अग्निशमन प्रमुख अधिकारी रवींद्र अंबुलगेकर, सहायक आयुक्त (के पश्चिम) डॉ. पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय निर्मळ यांचा या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

याठिकाणी पाठवाव्यात सूचना

परवाना देण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा व्हावी, पर्यायाने नागरिकांना या प्रक्रियेमध्ये सध्या येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, त्यात पारदर्शकता यावी, ही कार्यवाही करताना त्यामध्ये लोकसहभागही महत्वाचा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध अनुज्ञापनांमध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम ३९४ अंतर्गत देण्यात येणारे व्यापार परवाना, उपहारगृह परवाना, मुंबई महानगरपालिका अधिनियम ३९० अंतर्गत देण्यात येणारा कारखाना परवाना, पावसाळी छत इत्यादींबाबत काही सूचना असल्यास नागरिकांनी किंवा व्यवसायिकांनी दिनांक २० ऑगस्ट २०२३ पूर्वी या सूचना [email protected] या ईमेलवर पाठवाव्यात, असे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा उपआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.