BMC : मुंबईतील मॅनहोल्सची पुन्हा प्रत्यक्ष पाहणी; येत्या २१ ऑगस्टला अहवाल सादर करण्याचे निर्देश

150
मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या हद्दीमध्ये, विभाग कार्यालय किंवा मध्यवर्ती यंत्रणा यांनी आपल्या अखत्यारितील मॅनहोल झाकले असल्याची पुन्हा एकदा खातरजमा करावी. येत्या २० ऑगस्ट २०२३ पर्यंत ही कार्यवाही करुन त्याची पूर्तता केल्याबाबत  २१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. सर्व संबंधितांनी काटेकोरपणे कार्यवाही पूर्ण करावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई अथवा निष्काळजीपणा आढळून आल्यास त्यांच्यावर  कडक कारवाई केली जाईल असेही सक्त निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

तज्ञ वकीलांसह सहायक आयुक्त करणार संयुक्त पाहणी

दरम्यान, मॅनहोल विषयक कार्यवाहीचा पडताळणी अहवाल हा माननीय मुंबई उच्च न्यायालयात तीन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करावयाचा आहे. त्याअनुषंगाने  उच्च न्यायालयाकडून विभागनिहाय नियुक्त तज्ज्ञ वकील तसेच संबंधित सहायक आयुक्त हे  २१ ऑगस्ट २०२३ पासून संयुक्त पाहणी करतील आणि त्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने माननीय न्यायालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे.

पुढील सोमवार पूर्वी मॅनहोल्सचे सर्वेक्षण…

मुंबई महानगरातील सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये, विभाग कार्यालयाच्या अखत्यारितील किंवा मध्यवर्ती खात्यांच्या कार्यक्षेत्रातील मॅनहोलचे सोमवारी १९ जून २०२३ पूर्वी सर्वेक्षण करावे. तसेच, एकही मॅनहोल खुले / उघडे राहणार नाही, याची खात्री करावी, असे स्पष्ट  निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल यांनी यापूर्वी म्हणजे दिनांक १४  जून २०२३ रोजी सर्व विभागांचे सहायक आयुक्‍त आणि मध्‍यवर्ती यंत्रणांचे प्रमुख अभियंता यांना  दिले होते. तसेच  पावसाळ्यात कोणतेही मॅनहोल उघडे राहू नये, पर्यायाने दुर्घटना घडू नये, याची खात्री करणे महत्‍त्‍वाचे आहे, असे आयुक्तांनी नमूद केले होते.

सहा हजार  मॅनहोल्सवर प्रतिबंधक जाळ्या लावण्यात आल्याची खात्री करणार…

याचअनुषंगाने, शुक्रवारी  मुंबई उच्च न्यायालयात मॅनहोल्स बाबत झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने,    इकबाल सिंह चहल यांनी , आपापल्या अखत्यारितील सर्व मॅनहोल्स सुव्यवस्थितरित्या झाकले आहेत, याची दिनांक २० ऑगस्ट २०२३ पर्यंत पुन्हा एकदा खातरजमा करावी. तसेच, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ६ हजार ३०८ मॅनहोल्सवर प्रतिबंधक जाळ्या लावण्यात आल्याची देखील खातरजमा करावी असे  निर्देश सर्व विभागांचे सहायक आयुक्‍त आणि मध्‍यवर्ती यंत्रणांचे प्रमुख अभियंता यांना  दिले आहेत.
ही खातरजमा पुन्हा एकदा करुन, तसेच एकही मॅनहोल खुले राहणार नाही, अशारितीने सर्व आवश्यक ती सर्व कार्यवाही  २० ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण करावी. त्याचप्रमाणे  २१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता किंवा त्यापूर्वी याची खातरजमा व कार्यवाही पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे, असे आयुक्तांनी शुक्रवारी ११ ऑगस्ट २०२३ रोजी निर्देश दिले आहेत.

न्यायालयाकडून विभागनिहाय तज्ज्ञ वकील नेमणार!

दरम्यान, मॅनहोलविषयक कार्यवाहीचा  मुंबई उच्च न्यायालयात तीन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करावयाचा आहे. तसेच, याअनुषंगाने  न्यायालयाकडून विभागनिहाय तज्ज्ञ वकील नेमण्यात येणार आहेत. हे तज्ज्ञ वकील व संबंधित सहायक आयुक्त यांच्याद्वारे आपापल्या हद्दीत  २१ ऑगस्ट २०२३ पासून संयुक्त विभागीय पाहणी करतील. तसेच त्या दोघांच्या संयुक्त स्वाक्षरीसह  न्यायालयाला मॅनहोलबाबतचा अहवाल सादर केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट  केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.