कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची होतेय दमछाक! 

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णांची माहिती मिळण्याकरता हेल्पलाईनसह मदत कक्ष प्रत्येक कोविड सेंटर व रुग्णालयांमध्ये सुरु करण्याची मागणी नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी केली आहे.

148

मुंबईमध्ये मार्च महिन्यात कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढून महापालिकेसह खासगी आरोग्य व्यवस्थेवरील भार वाढू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोविड केअर सेंटर व कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांची भरती मोठ्या संख्येने होवू लागली. परिणामी दाखल रुग्णांची माहिती जाणून घेताना रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होत असून याकरता प्रत्येक कोविड काळजी केंद्रासह कोविड रुग्णालयांमध्ये नातेवाईकांना त्यांच्या रुग्णांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईनसह मदत कक्ष स्थापन करण्याची मागणी होत आहे.

हेल्पलाईनसह मदत कक्ष स्थापन करण्याची मागणी!

सध्या मोठ्या प्रमाणात सर्व कोविड सेंटर व रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल केले जात असल्याने रुग्ण खाटाही भरु लागल्या आहेत. परंतु कोविड रुग्णांसोबत नातेवाईकांना तिथे राहण्यास प्रवेश दिला जात नसल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या माणसाच्या आरोग्याची माहिती घेताना दमछाक होत आहे. त्यामुळे भायखळा-माझगाव येथील नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देवून नातेवाईकांना आपल्या रुग्णांची माहिती मिळण्याकरता हेल्पलाईनसह मदत कक्ष प्रत्येक कोविड सेंटर व रुग्णालयांमध्ये सुरु करण्याची मागणी केली आहे. अशाप्रकारे मदत कक्ष स्थापन केल्यास नातेवाईकांना आपल्या रुग्णांची माहिती त्या हेल्पलाईनवरून घेता येईल आणि त्यांच्या मनातील काळजी दूर होईल, असे म्हटले आहे.

(हेही वाचा : लॉकडाऊनला विरोध नाही, पण समाजातील शेवटच्या घटकाचे काय? )

वाढत्या रुग्ण संख्येचा आरोग्य व्यवस्थेवर!

मागील महिन्यापासून कोविड रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत असून १ एप्रिल रोजी रुग्ण संख्या ८,६४६ एवढी झाली, तर १८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुंबई महापालिका आपली कोविड रुग्णालये, तसेच कोविड केअर सेंटर यांची क्षमता वाढवत आहे. तसेच खासगी रुग्णालयातही ८० टक्के खाटा राखीव ठेवून त्यावर महापलिका दराने उपचार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत आहे. परंतु वाढत्या रुग्ण संख्येचा ताण आता महापलिका आणि खासगी तसेच शासकीय कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर येत आहे.

लक्षणे नसलेल्या रुग्णांनाही दाखल करावे लागते!

मुंबईतील ८२ टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले असले तरीही सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करावे लागते. परिणामी रुग्ण खाटा भरल्या जात आहे. कोविड रुग्ण असल्यास त्यांच्यासोबत नातेवाईकांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे रुग्णांची माहिती मिळवताना नातेवाईकांची दमछाक होते. कोणत्याही डॉक्टरला फोन करावा तर ते रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त असतात. त्यांना वारंवार फोन करणे म्हणजे त्यांच्या कर्तव्यात व्यत्यय आणण्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे कोविड रुग्णालय किंवा कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्णांची खुशाली नातेवाईकांना व्हावी, तसेच नातेवाईकांना आपल्या माणसाची विचारपूस करता यावी याकरता प्रत्येक कोविड रुग्णालय तसेच कोविड काळजी केंद्र यामध्ये हेल्पलाइनसह मदत कक्ष (हेल्प डेस्क) सुरू करण्याचे निर्देश त्वरित पारित करण्यात यावे, अशी सूचना सोनम जामसूतकर यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.